मुरगूडच्या रूग्णालयासाठी बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 00:39 IST2016-03-21T21:05:51+5:302016-03-22T00:39:13+5:30
कृती समितीची स्थापना : रूग्णालय ५० बेडचे करण्याची मागणी; दोन दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

मुरगूडच्या रूग्णालयासाठी बंदचा इशारा
मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील ग्रामीण रूग्णालय ५० बेडचे करण्याबाबत आज कृती समितीची स्थापना करण्यात आली असून, जर वरिष्ठ पातळीवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर २५ मार्चला मुरगूड शहर बंद करण्याचा इशारा या कृती समितीने दिला आहे. दोन दिवसांत वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुरगूडमध्ये कृती समितीची बैठक होणार असून, लोकमतमधून आलेल्या बातमीमुळेच सदरचा प्रश्न तडीस जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने रूग्णालय आवारात झालेल्या बैठकीत अनेकांनी ‘लोकमत’चे आभार मानले.
१५ मार्चच्या लोकमतमध्ये मुरगूडचे ग्रामीण रूग्णालय ५० बेडचे व्हावे या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर बातमीची दखल घेऊन मुरगूड नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये याबाबतचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. याशिवाय समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक दलितमित्र डी. डी. चौगले, बबन बारदेस्कर यांनी रूग्णालय अधिकाऱ्यांबाबत चर्चा करून आंदोलनाचा इशारा दिला. याबाबतही लोकमतमधून सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. यामुळेच आज शहरातील शंभरहून अधिक नागरिकांनी रूग्णालयात जावून वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोरच याबाबत चर्चा केली.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये या रूग्णालयात ३० बेडवरून ५० बेडमध्ये रुपांतरीत करणे अत्यावश्यक असल्याचे मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी सांगितले. यासाठी निवेदन, आंदोलन आदी मार्गाचा वापर करणे किंवा वरिष्ठांबरोबर चर्चा करणे यासाठी कृती समितीची आवश्यकता असल्याने सर्वानुमते कृती समितीची स्थापना केली. यामध्ये दलितमित्र डी. डी. चौगले, दगडू शेणवी, विरोधी पक्षनेता किरण गवाणकर, व्यापारी किशोर पोतदार, समाजवादीचे अध्यक्ष बबन बारदेस्कर, प्रदीपक वर्णे, सिकंदर जमादार, राजू चव्हाण व समाधान पोवार यांचा समावेश केला आहे.
या समितीमार्फतच डी. डी. चौगले व दगडू शेणवी यांनी आरोग्य सेवा मंडळ कोल्हापूरचे उपसंचालक आर. बी. मुगडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि आपल्या मागणीबाबतची सविस्तर माहिती दिली. दरम्यान, मुगडे यांनी दोन दिवसांत याबाबत आपण मुरगूडमध्ये येऊन कृती समितीबरोबरच चर्चा करू आणि ५० बेडबाबत सकारात्मक प्रयत्न करू असे आश्वासन दिले. पण चर्चेमधून काहीच निर्णय झाला नाही तर मात्र २५ मार्च दिवशी मुरगूड बंद ठेवण्याचा इशाराही कृती समितीने दिला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल माळवदे व डॉ. अमोल पाटील यांना नागरिकांनी दिले. यावेळी डॉ. माळवदे यांनीही आपण तत्काळ आपल्या भावना वरिष्ठांना कळवितो, असे अभिवचन दिले.
यावेळी रूग्णालयामध्ये दलितमित्र डी. डी. चौगले, उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, बबन बारदेस्कर, किरण गवाणकर, किशोर पोतदार, जयवंत हावळ, भिकाजी कांबळे, चाचा जमादार, गणेश तोडकर, समाधान पोवार, रोहित मोरबाळे, सुहास भारमल, दिग्वीजय चव्हाण, ऋषीकेश भारमल, राजू चव्हाण, पी. एस. दरेकर, बाळू कांबळे, रोटरी अध्यक्ष बी. एस. खामकर, पांडुरंग चव्हाण, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी नसल्याने रोष
सकाळी ९च्या सुमारास शहरातील सुमारे शंभरभर नागरिक ग्रामीण रूग्णालयामध्ये निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. सकाळी आठपासूनच तपासणीसाठी रूग्णांची मोठी रांग लागली होती. पण साडेदहापर्यंत वैद्यकीय अधिकारी आले नव्हते. त्यामुळे निवेदन देण्यासाठी गेलेले नागरिक भडकले. त्यांच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामारे जावे लागले. पण अचानक बैठक लागल्याने थोडासा वेळ झाला, असे सांगून डॉक्टरांनी वेळ मारून नेली.
निवेदन, आंदोलन आदी मार्गांचा वापर करणे किंवा वरिष्ठांबरोबर चर्चा करणे यासाठी कृती समितीची आवश्यकता असल्याने कृती समितीची स्थापना