बांदिवडेतील ‘तो’ खून २३ लाख हडपण्यासाठी
By Admin | Updated: June 3, 2015 01:11 IST2015-06-03T01:08:46+5:302015-06-03T01:11:17+5:30
फिर्यादीच निघाला खुनी : महिन्यापूर्वी झालेल्या खुनाचा छडा; चुलत पुतण्यासह दोघांना अटक

बांदिवडेतील ‘तो’ खून २३ लाख हडपण्यासाठी
कोल्हापूर / पन्हाळा : फसवून विकलेल्या जमिनीचे २३ लाख रुपये हडप करण्याच्या हेतूने चुलत पुतण्यानेच बांदिवडे (ता. पन्हाळा) येथे नाना बापू पाटील (वय ५७) यांचा महिन्याभरापूर्वी खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी पुतण्या अभिमन्यूू अर्जुन पाटील ऊर्फ आबा पाटील (वय २७, रा़ बांदिवडे, ता़ पन्हाळा) याला मंगळवारी कसबा बावडा येथे अटक केली. अभिमन्यू हा जमीन खरेदी विक्री एजंट म्हणून काम करतो. त्याने संशयित म्हणून नाव घेतलेल्यांचे घर पेटविल्याप्रकरणी अभिमन्यूचा भाऊ विश्वास पाटील यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे येथील नाना बापू पाटील (वय ५७) यांचा मृतदेह
३ मे रोजी सकाळी बांदिवडे-करंजफेण रोडवर करंजफेण गावच्या हद्दीतील नाल्यात आढळला होता. डोक्यात मारहाण केल्याने आणि गळा दाबल्याने त्यांचा मृृत्यू झाल्याचे पोलीस पंचनाम्यात स्पष्ट झाले होते़ आपला चुलता नाना पाटील याचा खून नामदेव गिरीने केल्याचा कांगावा अभिमन्यू अर्जुन पाटील याने केला होता. यानंतर त्याने गावातील लोकांना भडकावून नामदेव गिरी याच्या शेतातील घरावर हल्ला करून ते पेटवूनही दिले होते़ शिवाय पन्हाळा पोलीस ठाण्यात येऊन गिरी याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय नाना पाटील यांचा मृतदेह दवाखान्यातून न हलविण्याचा इशारा दिला होता़
याप्रकरणी पोलिसांनी अभिमन्यूने दिलेल्या फिर्यादीवरून नामदेव गिरी याला अटक करून त्याच्याकडे चौकशी
केली असता या खून प्रकरणात
त्याचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले होते़ याच दरम्यान पोलिसांना नाना पाटील यांनी गेल्या सहा महिन्यांत तीन ठिकाणच्या जमिनी विकल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, अभिमन्यू पाटील यानेच नाना पाटील याच्या जमिनी रणजित इंगवले, प्रवीण सूर्यवंशी आणि डॉ. प्रभाकर कांबळे यांना विकल्याचे तपासात पुढे आले होते़ या तिघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी नाना पाटील यांच्याकडून जमीन घेताना सर्व रक्कम अभिमन्यू पाटीलकडे दिल्याचे सांगितले; परंतु पोलिसांनी नाना पाटील यांच्या घरी चौकशी केली असता घरच्यांनी, नाना यांनी जमीन विकल्याचे माहीत नसल्याचे सांगितल्याने अभिमन्यूवरील संशय बळावला होता़ अभिमन्यूने नाना पाटील यांची ७६ गुंठे जमीन प्रतिगुंठा ४० हजार रुपये दराने विकली होती; परंतु हे पैसै नाना पाटील यांना न देता त्याने ते बोलेरो गाडी, बुलेट, ट्रॅक्टर खरेदीसाठी आणि घर बांधण्यासाठी वापरल्याची माहिती पोलिसांना मिळाली़
ज्या दिवशी नाना यांचा मृतदेह मिळाला, त्याच्या आदल्या दिवशी नाना हे अभिमन्यूच्या बोलेरो गाडीतून गेल्याची आणि नंतर तो दिसला नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ याच्या आधारे वीस-पंचवीस दिवस पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर नाना यांचा खून अभिमन्यूनेच केल्याची खात्री झाल्याने पोलीस मागावर होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत होता़ मंगळवारी सकाळी अभिमन्यू कसबा बावडा परिसरातील मध्यवर्ती शासकीय इमारतीच्या परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पन्हाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत गवारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोनि विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने सापळा रचून अभिमन्यूला याला ताब्यात घेतले़ यावेळी अभिमन्यूचा सख्खा भाऊ विश्वास पाटील यालाही ताब्यात घेतले आहे.
संशयित कुटुंबच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
४चुलत्याचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या अभिमन्यू याच्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारीची स्वरुपाची आहे़ अभिमन्यू याच्यासह त्याचा भाऊ विश्वास, वडील अर्जुन यांच्यावर चोरी, मारामारी यांच्यासह अनेक गुन्हे पन्हाळा व शाहूवाडी पोलिसांत दाखल आहेत़
४अभिमन्यू याने वाघवे या गावात सख्ख्या बहिणीच्या घरी चोरी केल्यानंतर त्याला वाघवेतील नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले होते़
चोरीची तक्रार दिल्याच्या रागातून घेतले गिरींचे नाव
अट्टल चोरटा असलेला अभिमन्यू याने नामदेव गिरी यांच्या शेतातील मोटरपंपाची पाच वर्षांपूर्वी चोरी केली होती़ त्यावेळी नामदेव गिरी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिमन्यूवर कारवाई केली होती़ हा राग मनात धरून अभिमन्यू याने गिरी यांना खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्याची योजना आखली होती.
फसवणूक झालेल्यांनी संपर्क करा : यशवंत गवारी
पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अभिमन्यू आणि त्याचा भाऊ विश्वास यांनी फसवणूक करून विकल्या असून, त्या शेतकऱ्यांचे पैसेही भागविले नसल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. आणखी कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी केले आहे.