अतुल आंबीइचलकरंजी (जि.कोल्हापूर) : केंद्र सरकारने बांगलादेशातून आयात होणारे कापड, तयार कपडे, होजिअरी याला बंदी घातल्यामुळे देशभरातील वस्त्रोद्योगाला ‘अच्छे दिन’ येणार आहेत. देशात तयार होणाऱ्या कापडाला मागणी वाढणार असल्याने या उद्योगातील रोजगार आणि उलाढालही वाढणार आहे.भारत व सार्क देशांतर्गत ठरलेल्या करारानुसार आयात शुल्क माफीमध्ये वस्तूंची आयात-निर्यात केली जात होती. बांगलादेशात एकूण १७ हजार पॉवरलूम असताना कराराचा गैरफायदा घेत चीनचे लाखो मीटर कापड चिंधी या नावाखाली दररोज भारतात पाठविले जात होते. त्याचबरोबर बांगलादेशातील काही कंपन्या चीनकडून कापड खरेदी करून त्याचे गारमेंटिंग (तयार कपडे) करून ते भारतात कमी दरात विकत होते. परिणामी भारत देशात तयार होणाऱ्या कापडाची मागणी घटत होती.नुकतेच भारत सरकारने बांगलादेशमार्गे येणारे सर्व वस्त्रोद्योग घटक आयात करण्यास बंदी घातली. तसेच इतर देशांना जाणारे वस्त्रोद्योग घटक आता फक्त जवाहरलाल नेहरू पोर्ट मुंबई येथूनच रवाना होतील. अन्य कोणत्याही बंदरांमध्ये बांगलादेशी कंटेनर वाहतुकीसाठी येणार नाही, असा आदेश लागू केला आहे.
या निर्णयामुळे देशातील वस्त्रोद्योगाला चालना मिळणार आहे. कोलकत्ता ही भारतातील मोठी बाजारपेठ आहे. उत्तर पूर्व भारतातील बंगालसह सर्व राज्यांची खरेदी ही कोलकत्ता बाजारपेठेतून होते. आता ही संपूर्ण बाजारपेठ भारतातील वस्त्रोद्योजकांना खुली होणार आहे. या निर्णयाचे देशभरातील वस्त्रोद्योजकांकडून स्वागत होत आहे.
केंद्र शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, देशभरातील वस्त्रोद्योजकांना दिलासा देणारा आहे. हा निर्णय कागदोपत्री न राहता अवैध मार्गाने बेकायदेशीरपणे देशात येणारे कापडही रोखण्यासाठी यंत्रणा शासनाने सज्ज ठेवावी. - विनय महाजन, अध्यक्ष-यंत्रमागधारक जागृती संघटना, इचलकरंजी