‘मोहल्ला अस्सी’वर बंदी घाला
By Admin | Updated: July 12, 2015 21:24 IST2015-07-12T21:24:32+5:302015-07-12T21:24:32+5:30
सावंतवाडीत आंदोलन : हिंदू संघटनांची मागणी

‘मोहल्ला अस्सी’वर बंदी घाला
सावंतवाडी : भगवान शिव आणि श्रीक्षेत्र काशी यांचा अवमान करणाऱ्या ‘मोहल्ला अस्सी’ चित्रपटावर बंदी घाला. तसेच संबंधितांवर शासनाने गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शनिवारी येथील गांधी चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलन, हिंदू जनजागृत समिती व हिंदू संघटनांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी संदेश गावडे, राजा मळेवाडकर, संदीप आळवे, एकनाथ सावंत, सीताराम म्हापणकर, गीतेश परब, रघुनाथ सावंत, रंजना राऊळ, उषा निकम, सुचिता सावंत, पल्लवी पेडणेकर आदी उपस्थित होते.
कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या ‘मोहल्ला अस्सी’ या हिंदूद्रोही चित्रपटास सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. संकेतस्थळावरून प्रसारित करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये भगवान शिव, साधूसंत, देवनदी, गंगा आणि काशी क्षेत्र यांचा हीन पातळीवर जाऊन उल्लेख करण्यात आला आहे. हिंदू संत, देवता यांचा अवमान करणाऱ्या आणि अश्लाघ्य विडंबन करणाऱ्या ‘मोहल्ला अस्सी’ या चित्रपटावर तत्काळ बंदी आणावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (वार्ताहर)