कागलमध्ये चाव्यांना बसणार मीटर
By Admin | Updated: November 27, 2014 00:20 IST2014-11-26T23:38:43+5:302014-11-27T00:20:30+5:30
अवैध मार्गाने पाणी वापर करणाऱ्यांना आळा बसणार

कागलमध्ये चाव्यांना बसणार मीटर
जहॉँगीर शेख - कागल -कागल नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील साडेसहा हजार चाव्यांना मीटर बसविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या योजनेमुळे पाण्याची आणि आर्थिक खर्चाची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे अवैध मार्गाने पाणी वापर करणाऱ्यांना आळा बसणार आहे.
तेराव्या वित्त आयोगातून मंजुरी मिळून ही रक्कमही नगरपालिकेकडे वर्ग झाली आहे. कागल शहराला पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. शहराची ३८ हजार लोकसंख्या आहे. सध्या रोज ८३ लाख लिटर पाणी दिले जाते. हे प्रमाण माणसी २०० लिटर भरते. शासन नियमाप्रमाणे माणसी ७० लिटर पाणी देणे क्रमप्राप्त आहे. या भरघोस पाणी उपलब्धतेमुळे पाणी वापरावरही नियंत्रण राहात नाही. ५० टक्के चाव्यांना तोटीच नाहीत. त्यामुळे एकदा पाणीपुरवठा सुरू झाला की संपेपर्यंत हे पाणी सुरू असते. अनेकांनी या नळाच्या पाण्यावर घराजवळ भाजीपाला पिकविला आहे. तर एक चावी कनेक्शन घेऊन त्याचा पाणीपुरवठा भाडेकरूंना करण्यासाठी काहींनी थेट मोटारी बसवून पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या वार्षिक पाणीपट्टी १३३० रुपये आहे. शासनाने ही पाणीपट्टी १६१२ प्रमाणे घ्यावी, असे आदेश दिलेले आहेत. नळांना मीटर बसवून त्याप्रमाणे किती प्रमाणात पाणी वापरले, तितकेच बिल ग्राहकांना येणार असल्याने काटकसरीने पाणी वापरणाऱ्या ग्राहकांना न्याय मिळणार आहे. तर अवैध मार्गाने पाणी वापर करणाऱ्यांना त्या प्रमाणात पालिकेकडे पैसे भरावे लागणार आहेत. जिल्ह्यात यापूर्वी काही नगरपालिकांमध्ये हा प्रयोग झाला आहे. मात्र यातील मीटर स्वत: ग्राहकांनी बसविले आहे. नळांना मीटर बसविण्यासाठी दीड कोटी रुपयांचा थेट निधी मंजूर होणारी कागल नगरपालिका जिल्ह्यात एकमेव आहे. आता याची अंमलबजावणी कशी होते? यावर या योजनेचे यश-अपयश अवलंबून आहे.
उत्पन्न आणि खर्च....
२०११-१२ या आर्थिक वर्षात पाणीपुरवठा खर्च ८७ लाख, तर उत्पन्न केवळ ४० लाख रुपये असे चित्र होते. म्हणजे हा विभाग ५० लाख तोट्यात होता. २०१३-१४ मध्ये खर्च एक कोटी पाच लाख आणि उत्पन्न ९२ लाख रुपये अशी प्रगती या विभागाने केली आहे.