बांबू लागवडीने आजाऱ्याच्या अर्थकारणाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:24 IST2021-09-19T04:24:59+5:302021-09-19T04:24:59+5:30
जागतिक बांबू दिनानिमित्त आजऱ्यात कार्यशाळा आजरा : कमी खर्चात उत्पादन व कोणत्याही प्रकारचा खर्च नसणारे बांबू हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ...

बांबू लागवडीने आजाऱ्याच्या अर्थकारणाला चालना
जागतिक बांबू दिनानिमित्त आजऱ्यात कार्यशाळा
आजरा : कमी खर्चात उत्पादन व कोणत्याही प्रकारचा खर्च नसणारे बांबू हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणारे उत्पादन आहे. बांबू लागवडीने आजऱ्याच्या अर्थकारणाला चालना मिळेल, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते जागतिक बांबू दिवसानिमित्त आजऱ्यात आयोजित कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे समन्वयक अजित भोसले होते.
स्वागत व प्रास्ताविक परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके यांनी केले. सहायक वनसंरक्षक एन. एस. कांबळे यांनी बांबू लागवडीचे अर्थकारण, तर उपवनसंरक्षक आर. आर. काळे यांनी बांबूची लागवड व त्यापासून मिळणारे उत्पन्न याची माहिती कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात दिली. कार्यशाळेत सतीश लवटे, प्रवीण सोनवले, अरविंद कल्याणकर, संगीता वडे, भाग्यश्री पवार - फरांदे, डॉ. अजय राणे, अभिजित गाणू यांनी बांबू हस्तकला, बांबूपासून धागा व कापडनिर्मिती, बांबू लागवड मशागत, बांबूपासून कलाकृती, अगरबत्ती उत्पादन, बांबूचे व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्प, बांबूपासून रोजगाराची संधी याबद्दल माहिती दिली. कार्यशाळेस आजरा गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कृष्णा वरेकर, सतीश कांबळे, कृष्णा डेळेकर यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते.
फोटो कॅप्शन - आजऱ्यातील बांबू उत्पादन कार्यशाळेत बोलताना आमदार प्रकाश आबिटकर. शेजारी अजित भोसले, आर. आर. काळे, एन. एस. कांबळे.