बांबवडेत वाहतूक काेंडीने सगळेच बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:49+5:302021-02-05T06:59:49+5:30
राजाराम कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील बाजारपेठेतीतील मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीने ...

बांबवडेत वाहतूक काेंडीने सगळेच बेजार
राजाराम कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील बाजारपेठेतीतील मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीने वाहनधारक, नागरिक त्रस्त झाले आहेत. शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यासाठी कायमस्वरूपी येथे पोलीस नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या उसाचा हंगाम सुरू असल्याने दररोज उसाची वाहतूक सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला टू व्हीलर गाड्यांची पार्किंग असते. तसेच दुकानाचे बोर्ड रस्त्यावर उभे केले आहेत. काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. अंबिरा पुलावर दोन्ही बाजूला खासगी वाहतूक करणाऱ्या गाड्या उभ्या असतात. सरूड, पिशवी मार्गावर दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गवर दररोज बॉक्साईट, कोळसा, मळी वाहतूक करणारी अवजड वाहने धावत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे. शाहूवाडी, बांबवडे पोलीस चौकीसमोर एसटीचा थांबा आहे. येथे एसटी वळवण्यासाठी देखील चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. पोलीस चौकीसमोर खासगी गाड्या, टू व्हीलर गाड्या पार्किंग केल्या जातात. याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. पोलीस ठाण्याने ट्रॅफिक पोलीस नेमला आहे . पोलीस मात्र वाहतूक सुरळीत करण्याऐवजी ठमके वाडी फाट्यावर पर्यटकांच्या गाड्या डवून तपासणी करण्यात धन्यता मानतात.
.............
जनतेने न्याय मागायचा कुणाकडे
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य पोलीस विसरलेले दिसतात. वरकमाईसाठी वाहतुकीच्या कोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, याचा त्रास परजिल्ह्यांतून पर्यटनासाठी आलेले पर्यटक, भविक यांना होत आहे. वाहतुकीची कोंडी सोडवायची असेल तर कायमस्वरूपी सरुड फाटा, पिशवी रस्त्यावर दोन पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे.
............
एकत्र येऊन मार्ग काढावा
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण हटवले पाहिजेत, रस्त्यावर उभा असणाऱ्या वडाप गाड्या, टू व्हीलर गाड्या बाजार भरणाऱ्या जागेवर पर्किंग करणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या कोंडीवर मार्ग काढणे गरजेचे आहे, अन्यथा या वाहतुक कोंडीचा त्रास सर्वांनाच होत आहे.
.................
शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे वाहतुकीची काेंडी नित्याचीच झाली आहे.