बामणीच्या युवकाचा खून पैशातून
By Admin | Updated: July 25, 2016 00:37 IST2016-07-25T00:37:27+5:302016-07-25T00:37:27+5:30
गूढ उकलले : आरोपी मच्छिंद्र वडर याला अटक; झटापटीत झाला मृत्यू

बामणीच्या युवकाचा खून पैशातून
कोल्हापूर : बामणी (ता. कागल) येथील पप्पू बाळासो माने (वय १७) या युवकाच्या खून प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी लावला. या प्रकरणी रविवारी पोलिसांनी मच्छिंद्र वडर (२९, रा. हुपरी, ता. हातकणंगले) याला अटक केली. उसनेवारीच्या पैशातून खून केल्याची आरोपी मच्छिंद्रने कबुली दिली आहे.
पप्पू माने याच्या घरातून सात हजार रुपये व सोन्याच्या अंगठ्या घेऊन जाताना झटापटीमध्ये त्याचा गळा चिरला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याला ठार मारणे हा आपला उद्देश नव्हता, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.
पप्पू माने हा दि. १९ जुलैला एकटाच घरी असताना त्याचा गळा चिरून खून करण्यात आला होता. या घटनेने बामणीसह कागल परिसर हादरून गेला होता. खून कोणी केला, कशासाठी केला, याबाबत उलट-सुलट चर्चा केली जात होती. चोरट्यांनी खून केल्याची चर्चाही पुढे आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गेली चार दिवस अहोरात्र तपास करून मारेकऱ्याचा छडा लावला. मारेकरी हा दुसरा तिसरा नसून पप्पूच्या घरी नेहमी ऊठबस करणारी जवळची व्यक्ती निघाल्याने कागल पोलिसही अवाक् झाले.
असा लागला छडा
मच्छिंद्र वडर याचे माने यांच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे तो त्यादिवशी घरी आला. पप्पूच्या वडिलांनी त्याच्याकडून काही उसने पैसे घेतले होते. ते घेण्यासाठी तो घरी आला असता पप्पू एकटाच घरी होता. त्याने आई-वडील कुठे आहेत, अशी विचारणा केली असता पप्पूने वडील कामावर गेले आहेत. आई व भाऊ कोल्हापूरला दवाखान्यात गेल्याचे सांगितले. घरी कोणी नसताना मच्छिंद्र हा घरातील डबे शोधू लागला.
यावेळी पप्पूने त्याला आई-बाबा घरी नाहीत, तू शोधाशोध करू नकोस, असे सांगितले. त्यावर त्याने तुझ्या बापाने माझ्याकडून उसने पैसे घेतले आहेत. मला आता पैशांची गरज आहे, असे सांगून डब्यातील सात हजार रुपये चिल्लर व सोन्याच्या अंगठ्या घेऊन तो जाऊ लागला.
यावेळी पप्पूने त्याला विरोध केला असता दोघांच्यात झटापट झाली. यावेळी घरात पडलेल्या काचेच्या तुकड्याने पप्पूच्या गळ्यावर वार केला.
खोलवर वार झाल्याने पप्पूचा जागीच मृत्यू झाला. अनपेक्षितपणे घडलेल्या घटनेनंतर मच्छिंद्र हा तेथून पसार झाला होता. तो कामधंदा न करता दारू व जुगार खेळत असल्याने कर्जबाजारी झाला होता.