बालमनांनी अनुभवली ‘सफर विमानां’ची
By Admin | Updated: January 19, 2015 00:34 IST2015-01-19T00:06:33+5:302015-01-19T00:34:05+5:30
‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे आयोजन : पहिल्या दिवशी अलोट गर्दी ; मंगळवारपर्यंत खुले राहणार प्रदर्शन

बालमनांनी अनुभवली ‘सफर विमानां’ची
कोल्हापूर : ‘बाबा विमान कसे आकाशात उडते हो...’, ‘विमानाला पंख का असतात?’, ‘दादा, ‘थ्री इडियट्स’मधील कॉडकॉप्टर असेच होते काय?’ असे बालमनात घोंघावणारे प्रश्न आज, रविवारी ‘लोकमत’ बाल विकास मंचने आयोजित केलेल्या ‘सफर विमानांची’ या प्रदर्शनात चुटकीसरशी सुटल्याचे चित्र होते. विमानाबाबत माहिती घेण्यासाठी पालकांसमवेत बालचमूंनी अलोट गर्दी प्रदर्शनास झाली होती. कमला कॉलेजच्या डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. भारत खराटे व शाहू दूध मार्केटिंग व्यवस्थापक सुनील मगदूम यांच्या हस्ते आज सायंकाळी पाच वाजता प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन झाले. याप्रसंगी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आय.सी.सी.आय. बँकेचे प्रवीण सावंत, ‘पीबीसी’स अॅरो हबचे बाळासाहेब चित्ते व प्रणव चित्ते, ‘लोकमत’चे इव्हेंट मॅनेजर दीपक मनाठकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विमानाने घिरटी घातल्याचा आवाज आल्यानंतर लहान मुले घराबाहेर, गच्चीवर मोकळ्या जागेत येऊन विमान पाहण्यासाठी आकाशाकडे नजरा लावतात. आकाशाकडे भिरभिरणारी नजर विमानाची छबी पाहण्यासाठी आतुर होते. शहरासह ग्रामीण भागात सर्रास दिसणारे हे दृश्य असते. बालमनाला विमानाबाबत पडणारे असंख्य प्रश्न घेऊनच आजच्या प्रदर्शनात बालचमू सहभागी झाला. विमानाची बारीकशी छबी मनात घेऊन आलेल्या बालकांनी जेव्हा आजच्या प्रदर्शनात हुबेहूब विमानांची प्रतिकृती पाहिली, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. स्वप्नातील विमानांच्या हुबेहूब असणाऱ्या प्रतिकृती पाहून झालेला आनंद बालकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता.
विमानाचा शोध कसा लागला, विमान कसे उडते यापासून ते विमान कसे तयार होते याची सविस्तर माहिती बाल विकास मंचने आयोजित ‘सफ र विमानांची’ या प्रदर्शनात दिली जात आहे. तसेच वैमानिक बनण्यासाठी काय करावे, त्या क्षेत्रामध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याबाबतही प्रदर्शनात सखोल माहिती दिली जात आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून दिवसभरात भेटी दिलेल्या हजारो कुटुंबीयांनी विमानाबाबतच्या ज्ञानात भर घातली. या ठिकाणी विविध ८० विमानांच्या प्रतिकृती व त्यांची रचना असलेले सुटे भाग मांडण्यात आले आहेत. विमानाच्या प्रत्येक घटकाबाबत शास्त्रशुद्ध माहिती ‘पीबीसी’स अॅरो हबचे डायरेक्टर प्रणव चित्ते देतात. दोन दिवस सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाचे प्रायोजक चाटे गु्रप आॅफ एज्युकेशन, सहप्रायोजक शाहू दूध, तर सादरकर्ते ‘पीबीसी’स अॅरो हब हे आहेत.
‘सफ र विमानाची’ हे प्रदर्शनातून शोच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांमध्ये विमान अभियांत्रिकी तसेच अवकाशयान तंत्रज्ञानाबाबतीत आवड निर्माण व्हावी हा उद्देश आहे. करिअरच्या दृष्टीने योग्य वाव या प्रदर्शनातून अनेकांना मिळणार आहे.
- भारत खराटे, चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर विभागाचे संचालक
प्रदर्शनामधून विद्यार्थ्यांना विमानांबाबत सविस्तर माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळते. आम्हाला काहीतरी वेगळे करायचे होते. ‘लोकमत’ची ही वेगळी संकल्पना असल्याने आम्ही त्यांना सहकार्य केले आहे आणि यापुढेही त्यांच्या वेगळ्या संकल्पनेला आमचे नेहमीच सहकार्य राहील. वैमानिक क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांनीही या प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्यावा.
- सुनील मगदूम, शाहू दूध मार्केटिंगचे व्यवस्थापक
मंगळवारपर्यंत प्रदर्शन खुले राहणार
मंगळवार (दि. २०) पर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री आठपर्यंत सर्वांसाठी पाहण्यासाठी खुले राहणार आहे. तसेच दर दोन तासांनी ‘क्वॉड कॉप्टर’चे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. त्याचा पालकांनी लाभ घ्यावा.