विधानपरिषदेचा बिगुल
By Admin | Updated: November 25, 2015 01:02 IST2015-11-25T00:57:29+5:302015-11-25T01:02:04+5:30
२७ डिसेंबरला मतदान : कोल्हापूरचा नवा ‘डॉन’ ३० ला ठरणार

विधानपरिषदेचा बिगुल
कोल्हापूर / मुंबई : कोल्हापूरसह विधानपरिषदेच्या राज्यातील आठ जागांच्या निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे संचालक धीरेंद्र ओझा यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केली. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २ डिसेंबरपासून सुरू होत असून, २७ डिसेंबरला मतदान व ३० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील नवा ‘डॉन’ कोण, याचा फैसला नववर्षाच्या आधीच दोन दिवस होणार आहे. एकूण ३८७ मतदार आहेत.
कोल्हापुरातील एका जागेसाठी जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघेल इतकी चुरस आहे. आमदार महादेवराव महाडिक विद्यमान आमदार असले तरी त्यांना माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आव्हान दिले असून, पहिली कुस्ती उमेदवारी कुणाला मिळते यासाठीच लागली आहे. सतेज पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास महाडिक बंडखोरी करणार हे स्पष्टच आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनीही जोरदार मोर्चेबांधणी करून उमेदवारीवर दावा सांगितला आहे. (कोल्हापूर-काँग्रेस), दीपक साळुंखे (सोलापूर-राष्ट्रवादी), अरुणकाका जगताप (अहमदनगर-अपक्ष) हे विद्यमान आमदार आहेत. महापालिका, नगरपालिकांसह गेल्या वर्षभरात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हीच नंबर वन असल्याचा दावा भाजपाने केला आहे. आठ मतदारसंघांमधील निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतात, हा औत्सुक्याचा विषय असेल. काँग्रेससमोर चार जागा वाचविण्याचे आव्हान असेल.
बेळगावातही निवडणूक
विधानपरिषदेच्या कर्नाटकातील २५ आणि तेलंगणातील १२ जागांसाठीही २७ डिसेंबरलाच मतदान होत आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील दोन जागेचा समावेश आहे. काँग्रेसचे वीरकुमार पाटील आणि भाजपचे महंतेश कवठगीमठ यांचा कार्यकाल संपल्याने ही निवडणूक होत आहे.