बळीरामला दहा दिवसांची कोठडी
By Admin | Updated: May 8, 2014 12:02 IST2014-05-08T12:02:55+5:302014-05-08T12:02:55+5:30
बेळगावमधील अण्णाकडून आणल्या नोटा

बळीरामला दहा दिवसांची कोठडी
कºहाड : २९ लाखांच्या बनावट नोटा जवळ बाळगल्याप्रकरणी ओगलेवाडी, ता. कºहाड येथील बळीराम श्रीपती कांबळे याला पोलिसांनी बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बळीरामने अण्णा नावाच्या बेळगावमधील एका व्यक्तीकडून बनावट नोटा आणल्याचे पोलिसांना सांगितले आहे. कºहाड तालुका पोलिसांना सोमवारी नाकाबंदी दरम्यान मोटारसायकलवरून संशयास्पदरीत्या वावरताना बळीराम कांबळे आढळून आला होता. झडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख रुपयांची रोकड सापडली. संबंधित नोटांची पाहणी केली असता त्या बनावट असण्याचा संशय आल्यामुळे पोलिसांनी बळीराम कांबळेला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून तपास सुरू केला. त्यानंतर कांबळे याच्या ओगलेवाडी येथील घरावर छापा टाकला असता आणखी तब्बल २८ लाखांच्या बनावट नोटा पोलिसांना आढळून आल्या. त्या सर्व नोटा पोलिसांनी जप्त केल्या. बळीराम कांबळेकडे जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख व पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी चौकशी केली. त्यावेळी बळीरामने बेळगावातील अण्णा नावाच्या व्यक्तीकडून या नोटा चलनात आणण्यासाठी आणल्या असल्याची कबुली दिली. मात्र, हा अण्णा नेमका कोण? याबाबत तो माहिती देत नाही. बळीरामला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दि. १७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (प्रतिनिधी)