आभाळाच्या छायेखाली बळीराजा गाळतोय घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST2021-05-28T04:18:20+5:302021-05-28T04:18:20+5:30
कोल्हापूर: बंगालच्या उपसागरातील ‘यास’ चक्रीवादळामुळे आज शुक्रवारपासून तीन दिवस जिल्ह्यात पाऊस बरसेल, असा हवामान खात्याचा अंदाज आल्यानंतर शेत-शिवारात एकच ...

आभाळाच्या छायेखाली बळीराजा गाळतोय घाम
कोल्हापूर: बंगालच्या उपसागरातील ‘यास’ चक्रीवादळामुळे आज शुक्रवारपासून तीन दिवस जिल्ह्यात पाऊस बरसेल, असा हवामान खात्याचा अंदाज आल्यानंतर शेत-शिवारात एकच धांदल उडाली आहे. भरून येणाऱ्या ढगांमुळे ऊन-सावल्यांच्या खेळात आभाळाच्या छायेत बळीराजा दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत घाम गाळताना दिसत आहे. त्यात कोरोना निर्बंधामुळे ११च्या आत शेतीसेवा केंद्र गाठून रांगेत उभे राहून बियाणे खरेदी करताना फुकटचा त्रास सोसावा लागत आहे.
जिल्ह्यात संपूर्ण मे महिन्यात वादळी पावसाने पाठ सोडलेली नाही. याचा उन्हाळी पिकांच्या काढणीत व्यत्यय असला, तरी ऊन पडेल तसे सुगी साधण्यात शेतकरी व्यस्त आहे. पावसामुळे खरिपासाठीची मशागतीची कामेही बऱ्यापैकी पूर्ण झाली असून, रोहिणीच्या मुहूर्तावर धूळवाफ पेरण्यांना सुरुवात देखील झाली आहे. मशागतीसह बांधबंदिस्तीचीही कामेही अंतिम टप्प्यात आहेत.
माॅन्सून १० जूनला कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून आला आहे. आता पेरण्या करून ठेवल्या की, वादळी पावसाच्या पाण्यावर उगवण होते, त्यानंतर माॅन्सून सुरू झाला की वाढही चांगली होते असा पारंपरिक अंदाज गृहीत धरून पेरण्या आटोपण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. पण, मजूर आणि बियाणे टंचाईने शेतकरी घाईला आला आहे. त्यातच कोरोना निर्बंधामुळे सकाळी ११ पर्यंतच दुकाने उघडी राहत असल्याने दुकानाजवळ पोहोचताना शेतकऱ्यांची दमछाक उडत आहे. तेथेही लांबलचक रांगा लागत असल्याने शेतकऱ्यांच्या दिवसभराच्या नियोजनाचे बाराच वाजत आहेत.
पेरणीसाठी घाई नको
माॅन्सून १० जूनपर्यंत कोकणात येणार असला, तरी महाराष्ट्र व्यापण्यास २५ जून उजाडणार आहे. या कालावधीत पावसाचा फारसा जोर असणार नाही. त्यामुळे ७० ते १२० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसाचा जोर वाढला नाही, तर दुबार पेरण्यांची वेेळ येऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी थोडे दमाने घ्यावे असे आवाहन केले जात आहे, पण तरीदेखील ज्यांची सिंचनाची सोय आहे, ते पेरणीचे धाडस करू लागले आहेत.
आजपासून पुन्हा पाऊस
‘यास’ या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून आज शुक्रवारपासून रविवारपर्यंत कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. साधारपणे २ जूनपर्यंत असेच पावसाळी वातावरण राहणार आहे.
फोटो: २७०५२०२१-कोल-बियाणे
फोटो ओळ: माॅन्सूनची चाहूल आणि वादळी पावसाचा अंदाज आल्याने शेतकऱ्यांनी गुरुवारी बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी केली. कोरोना निर्बंधामुळे सोशल डिस्टन्स राखून रांगेत उभे राहावे लागत असल्याने दुकानांसमोर अशा लांबलचक रांगा दिसत होत्या. (छाया: आदित्य वेल्हाळ)