बालिंगा - शिंगणापूर फाटा रस्ता उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:25 IST2021-09-26T04:25:35+5:302021-09-26T04:25:35+5:30
दुचाकी व चारचाकी वाहनांना कसरत करीतच करावा लागतोय प्रवास दुचाकी घसरल्याने अपघाताला आमंत्रण लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : ...

बालिंगा - शिंगणापूर फाटा रस्ता उखडला
दुचाकी व चारचाकी वाहनांना कसरत करीतच करावा लागतोय प्रवास
दुचाकी घसरल्याने अपघाताला आमंत्रण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : कोल्हापूर - गगनबावडा मार्गावरील बालिंगा ते शिंगणापूर फाटा रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता ठिकठिकाणी उखडल्याने वाहनधारकांची दमछाक होत असून, या मार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे. कोकणच्या दिशेने कोल्हापुरात येणारी बहुतांश वाहने याच मार्गावरून शहरात प्रवेश करतात. त्यामुळे बालिंगा-शिंगणापूर फाटा रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. मात्र, या मार्गावरील रस्त्याची सध्या चाळण झाली आहे. ईस्सार पेट्रोल पंप, शिवतेज हॉटेल व पुढे पाटील पेट्रोल पंपापर्यंत मोठे खड्डे पडले आहेत. शिवाय दहा-दहा फूट डांबरी रस्ताच उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून प्रवास करणे अडचणीचे ठरत आहे. रस्ता उखडून त्यात माती जाऊन बसल्याने हा रस्ता आहे की पाणंद असा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्यावर दिवसरात्र अवजड, प्रवासी, दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी गर्दी असते. सकाळी कामानिमित्ताने शहरात प्रवेश करणारे व सायंकाळी काम आटोपून घरी परतणारे वाहनचालक खड्ड्यांची अडथळ्यांची शर्यत पार करीत असतात. परिणामी, त्यांना घरी वेळेतही पोहोचता येत नाही.