कचऱ्याच्या विळख्यात बालिंगा फिल्टर हाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST2021-08-21T04:27:27+5:302021-08-21T04:27:27+5:30
कोपार्डे : बालिंगा येथील पम्पिंग हाऊसच्या आवाराला असलेले दगडी वॉल कम्पाउंड जमीनदोस्त झाले आहे. यामुळे कचरा, शेणाचे ढीग, जनावरांचे ...

कचऱ्याच्या विळख्यात बालिंगा फिल्टर हाऊस
कोपार्डे : बालिंगा येथील पम्पिंग हाऊसच्या आवाराला असलेले दगडी वॉल कम्पाउंड जमीनदोस्त झाले आहे. यामुळे कचरा, शेणाचे ढीग, जनावरांचे शेड व स्क्रँप वाहनांना लावण्याची सोयीची जागा बनली आहे.
संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा व ठिकाणच असुरक्षित असल्याचे सध्याचे चित्र आहे. बालिंगा येथे असणाऱ्या फिल्टर हाऊस भोवतालचे वॉल कम्पाउंड उखडलेले आहे. यामुळे कोणीही या पम्पिंग हाऊसच्या परिसरात ये -जा करण्यात सहज शक्य आहे. या पम्पिंग हाऊसच्या आवारात राजरोस जुगार व ओल्या पार्टीचे पेव फुटले आहे.
या फिल्टर हाऊसच्या प्रवेश द्वारावर गार्ड रुम आहे; पण या गार्ड रुमसमोर कचऱ्याचा ढीग असून, ही बंद असते. नागदेव वाडीतील रॉवॉटर फाऊंटनच्या स्लॅबखाली जनावरे बांधलेली असतात. याच परिसरात स्क्रँपचे रोडरोलर सोडण्यात आले आहेत तर ठिकठिकाणी शेणाचे ढीग पडलेले आहेत.
नागदेववाडी बाजूने अतिक्रमण करून काहींनी जनावरांचे शेड उभारले आहेत. शहराला पाणी पुरवठा करणारे पम्पिंग हाऊसचा परिसरच असुरक्षित असल्याचे चित्र आहे.
या पम्पिंग हाऊसच्या कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था असणाऱ्या कॉलनीतील खोल्याची पडझड सुरू आहे. यातही जनावरे बांधली जात असून, मद्यपींचा वावर असतो. रिकाम्या खोलीत जुुगार खेळला जात असून, भकास व असुरक्षित ठिकाणी राहण्यास कर्मचाऱ्यांची मानसिकता नाही.
फोटो १)फिल्टर हाऊस परिसरात कचऱ्याचा ढीग २)कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात जनावरे ३)बालिंगा फिल्टर हाऊस परिसरात शेणाचे ढीग व स्क्रँप वहाने.