बालदिनी दिले 'स्वच्छतेचे धडे'

By Admin | Updated: November 14, 2014 23:59 IST2014-11-14T23:50:08+5:302014-11-14T23:59:04+5:30

शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Baldini's 'Cleanliness Lessons' | बालदिनी दिले 'स्वच्छतेचे धडे'

बालदिनी दिले 'स्वच्छतेचे धडे'

कोल्हापूर : प्रतिमापूजन, स्वच्छता अभियान, विद्यार्थ्यांची भाषणे, मान्यवरांचे मार्गदर्शन, सप्ताहाचे आयोजन, चित्रपटांचे प्रदर्शन, वंचित मुलांसाठी आनंद मेळा अशा विविध उपक्रमांनी आज, शुक्रवारी पंडित नेहरू यांची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरी करण्यात आली. बालदिनाचे औचित्य साधून बहुतांश शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. काही शाळांमध्ये चित्रपट दाखविण्यात आले; तर विविध शाळांमध्ये मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पंडित नेहरू यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.
‘अवनि’ : अवनि संस्थेच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे संस्थेतील मुलांना बालकामगारांच्या जीवनावर आधारित ‘हवाहवाई’ हा चित्रपट दाखविण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शाहीर राजू राऊत व भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, संस्थेचे विश्वस्त संजय पाटील उपस्थित होते. यावेळी शाहीर राऊत यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद करणारा पोवाडा सादर केला. अनुराधा भोसले, शिरिषा येवतीकर यांनी संयोजन केले.
न्यू हायस्कूल : न्यू हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक व्ही. डी. महानवर यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी हर्षवर्धन खाडे व शिक्षिका एस. ए. शेख-देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर बालकल्याण संकुलामधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापक एस. पी. कणीरे, पर्यवेक्षक एम. सी. जयकर, एच. बी. खानविलकर उपस्थित होते.
स. म. लोहिया हायस्कूल : स. म. लोहिया हायस्कूलमध्ये आज स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. शुभदा दिवाण यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक एस. एस. चव्हाण यांनी प्रास्ताविक तर उपमुख्याध्यापिका एस. ए. निवटे यांनी परिचय करून दिला.
जयभारत हायस्कूल : डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर व सरस्वती सावंत बालमंदिर यांच्यावतीने ‘बालदिन’ साजरा करण्यात आला. सुमित्रा जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनी बालस्वच्छता मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत बनून कार्य करण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक अमर भोसले, मुख्याध्यापिका मीरा गोसावी उपस्थित होत्या.
दलितमित्र बापूसाहेब ग्रंथालय : ‘निसर्गमित्र’च्या वतीने न्यू माध्यमिक विद्यालय, उचगाव येथे माधवी काळे यांचे ‘बालपणीतील संस्कार’ या विषयावर व्याख्यान झाले. ‘माझे बालपण व मामाचा गाव’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
महाराष्ट्र हायस्कूल : महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये पर्यवेक्षक ए. एन. जाधव यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व्ही. बी. लोहार, पर्यवेक्षक ए. एस. रामाणे उपस्थित होते.
क्रांतिज्योती महात्मा फुले हायस्कूल : महात्मा फुले हायस्कूलमध्ये इनरव्हील क्लब आॅफ कोल्हापूरच्या अध्यक्षा कविता पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. अध्यक्षस्थानी एम. डी. देसाई होते. यावेळी शाळेला ग्रंथालय पेटी व दीडशे पुस्तके भेट देण्यात आली. मुख्याध्यापिका डी. आर. मांडरे यांनी प्रास्ताविक केले. प्रियंवदा घोरपडे, संस्थेचे अध्यक्ष राहुल मांडरे, अनुराधा मांडरे उपस्थित होते.
तेजस मुक्त विद्यालय : तेजस मुक्त विद्यालय व सन्मित्र विद्यालय यांच्या विद्यमाने बालदिनानिमित्त निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी भोसले, एस. पी. साळोखे, विजय पाटील, शिवाजी चिंचवडे उपस्थित होते.
नू. म. वि. हायस्कूल : नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक एस. टी. गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. वैष्णवी शिंदे व क्रांती संकपाळ या विद्यार्थिनींंनी मनोगतातून नेहरू यांचे कार्य मांडले. यावेळी एम. एस. पाटील उपस्थित होत्या.
न्यू प्राथमिक विद्यालय : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस संचलित न्यू प्राथमिक विद्यालयात ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छतेची शपथ घेऊन शाळेचा परिसर स्वच्छ केला. मुख्याध्यापिका एस. आर. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले.

Web Title: Baldini's 'Cleanliness Lessons'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.