बैलांसंगे बळीराजाची सरकारी कार्यालयावर धडक

By Admin | Updated: March 9, 2015 23:46 IST2015-03-09T23:36:45+5:302015-03-09T23:46:39+5:30

साताऱ्यात आंदोलन : ‘बळीराजा प्राणी बचाव’ समितीतर्फे बैलांसह उपोषण

Balasansangas hit the government's official office | बैलांसंगे बळीराजाची सरकारी कार्यालयावर धडक

बैलांसंगे बळीराजाची सरकारी कार्यालयावर धडक

 सातारा : शर्यतीच्या मैदानात फुरफुरणारा श्वास आणि जमीन उकरणारे पाय सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर धावत होते. निमित्त होतं बैलगाडी शर्यतीसाठी बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीच्या आंदोलनाचं. या समितीने चक्क शर्यतीचे बैल साताऱ्यात पळवले आणि जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण केले. राज्य शासनाने सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचा आधार घेत राज्यातील बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली आहे, ही बंदी तत्काळ उठवावी, या मागणीसाठी बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, याबाबत निर्णय न झाल्याने ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बैलांना घेऊन उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार समितीतर्फे शेकडो शर्यतप्रेमी लोक बैलजोड्या घेऊन सातारा शहरात आले होते. हे सर्वजण सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जमले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापासून पोवई नाक्यावरील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा व तिथून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शर्यतीच्या बैलगाड्या आणि बैलांचा गराडा जिल्हाधिकारी कार्यालयाला पडला. यामुळे येथे जवळपास तासभर वाहतूक कोंडी झाली. आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांनी याठिकाणी मनोगत व्यक्त केले. बैलगाडी शर्यतीवरील शासनाने घातलेली बंदी कशी चुकीची आहे, याबाबत यावेळी विवेचन करण्यात आले. यावेळी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावला आहे. वाघ, माकड, तेंदुवा, अस्वल, सांड या पाच जंगली प्राण्यांच्या प्रदर्शनावर व शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे, असे परिपत्रक काढले होेते; परंतु त्या परिपत्रकामध्ये ‘सांड’ या शब्दाचा अर्थ बैल असा लावण्यात आला आहे. बैल हा पाळीव प्राणी असून, बैलगाडी शर्यत हा महाराष्ट्रातील पारंपरिक संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा आहे. असा वारसा जपण्यासाठी या बैलगाडी शर्यतीत क्रौर्य होता कामा नये, या अटीवर परवानगी देणार आहोत, असे उद्गार केंद्रीय व पशुसंवर्धन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी डिसेंबर २०१४ मध्ये प्रसारमाध्यामांपुढे काढले होते. शर्यतीवरील बंदीही शासन उठवेल, असे स्पष्ट केल्याचे निवेदनात म्हटले आहे. बळीराजा प्राणी व बैलगाडी बचाव समितीचे अध्यक्ष हणमंतराव चवरे, आनंदराव मोहिते, तानाजी शेवाळे, सुहास जगताप, मंगेश पिंगळे, वैभव साळुंखे-पाटील, धनाजी शिंदे, प्रताप झांझुर्णे, सुभाष अष्टेकर, बाळासाहेब खंदारे यांच्यासह शेकडो पशुपालक शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनात बळीराजा प्राणी व बैलगाडी बचाव समितीचे अध्यक्ष हणमंतराव चवरे, आनंदराव मोहिते, तानाजी शेवाळे, सुहास जगताप, मंगेश पिंगळे, वैभव साळुंखे-पाटील, धनाजी शिंदे, प्रताप झांझुर्णे, सुभाष अष्टेकर, बाळासाहेब खंदारे, पशुपालक शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेणसडा भरदुपारी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजेरी लावली. डांबरी रस्त्याने बैलांना पळवतच आणण्यात आले होते. जवळपास तासभर ठिय्या मांडून उपोषण करण्यात आले. त्यानंतर शेतकरी आपल्या बैलांना घेऊन परतले. यात्रेतली पालं उठून गेल्यानंतर जसं कागद, पिशव्या इतस्तत: विखुरलेल्या दिसतात तद्वतच उपोषण संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वत्र शेण पडलेले दिसत होते. ...तर २० मार्चला विधानभवनावर मोर्चा शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणारा बैल हा पाळीव प्राणी आहे, त्याला जंगली ठरविण्यात आले असून, जंगली प्राण्यांच्या यादीतून ‘बैल’ वगळण्यात यावे व बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यात यावी, या मागण्यांसाठी २० मार्च रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा हणमंतराव चवरे यांनी यावेळी दिला. काळी माती तुडविणारे पाय धावले डांबरीवर ज्यांनी आजपावेतो केवळ शेतातील काळी माती तुडविली त्या बैलांनी डांबरी रस्त्यावरून धावत जाऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. गळ्यात बांधलेल्या घुंगरांचा आणि डांबरी रस्त्यावर पडणाऱ्या पावलांच्या आवाजानं वाहनचालकांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा परिषद रस्त्यानं भलरीदादांनी आपल्या बैलांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि तिथं ठिय्या मांडला.

Web Title: Balasansangas hit the government's official office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.