बाळासाहेब पाटलांच्या घरी दीड कोटीचे घबाड

By Admin | Updated: August 27, 2015 01:17 IST2015-08-27T01:17:23+5:302015-08-27T01:17:23+5:30

बँक खाती गोठवली : बाळगंगा धरण प्रकल्प घोटाळा प्रकरण

Balasaheb Patil's house is a half-millionth phantom | बाळासाहेब पाटलांच्या घरी दीड कोटीचे घबाड

बाळासाहेब पाटलांच्या घरी दीड कोटीचे घबाड



कोल्हापूर : बाळगंगा धरण प्रकल्प गैरव्यवहारप्रकरणी निवृत्त मुख्य अभियंता बाळासाहेब भाऊसाहेब पाटील (वय ६४, रा. महाडिक कॉलनी) यांच्या ‘शुभलक्ष्मी’ या बंगल्याची ‘एसीबी’च्या पथकाने मंगळवारी (दि. २५) झडती घेतली असता सुमारे दीड कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे आढळून आले. संशयित पाटील याच्या नावे तीन व पत्नीच्या नावे एका बँकेत खाते असून या सर्व खात्यांवरील रक्कम पाहून अधिकारीही चक्रावले. ही रक्कम गोठविण्यासाठी लाचलुचपत विभागाच्या वतीने बुधवारी संबंधित बँकांना पत्रे पाठविण्यात आली.
पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पात गैरव्यवहार केल्याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात अकरा संशयितांवर आर्थिक गैरव्यवहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांपैकी मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील यांच्या कोल्हापूर व सांगोला (सोलापूर) येथील निवासस्थानांवर छापे टाकण्याचे आदेश ठाणे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दत्ता कराडे यांनी कोल्हापूर व सोलापूर पोलिसांना दिले होते.
त्यानुसार मंगळवारी सकाळी लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम, पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, हवालदार अमर भोसले, संजय गुरव, मोहन सौदंती, बेगम गडकरी व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी असे सातजण मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास महाडिक कॉलनीतील पाटील यांच्या निवासस्थानी गेले. त्यांच्या बंगल्याचा दरवाजा बंद होता. पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी बेल वाजविली. काही क्षणांतच दरवाजा उघडण्यात आला. ‘बाळासाहेब पाटील आहेत का घरी?’ अशी विचारणा पद्मा पाटील यांनी केली.
यावेळी ‘हो, मीच बाळासाहेब, या,’ असे म्हणून त्याने आतमध्ये सर्वांना घेतले. कदम यांनी वरिष्ठ स्तरावरून तुमच्या बंगल्याची झडती घेण्याचे आदेश आल्याचे सांगितले. त्यावर पाटील याने ‘तुम्हाला जे काही तपासायचे आहे ते तपासा,’ असे म्हणून त्यांच्या कामात कोणताही अडथळा आणला नाही.
पाटील याची पत्नी शुभलक्ष्मी व मुलगा हर्षप्रतीक हे घरी होते. ते कारवाईची पाहणी करीत उभे होते. त्यांचा दुसरा मुलगा पुणे येथे शिक्षणासाठी गेला आहे. सुमारे १३ तास घरझडती चालली. या संपूर्ण मालमत्तेचे पुरावे पाटील याला सादर करावे लागणार आहेत.
कारवाईला सहकार्य
संशयित पाटील याच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. तो सावध होऊ नये, यासाठी त्याच्या कोल्हापूरसह सांगोला येथील बंगल्यावर पोलिसांनी एकाच वेळी छापा टाकला. पोलिसांचा छापा पडल्याची भीती किंवा दडपण त्याच्या चेहऱ्यावर शेवटपर्यंत दिसले नाही. कारवाईला स्वत:हून पुढे होऊन त्याने सहकार्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित बाळासाहेब पाटील यांच्या बंगल्याच्या संपूर्ण तपासणीचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. झडतीमध्ये मिळालेल्या मालमत्तेचा अहवाल ठाणे पोलीस अधीक्षकांना सादर केला आहे.
- पद्मा कदम, पोलीस उपअधीक्षक

Web Title: Balasaheb Patil's house is a half-millionth phantom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.