बाळासाहेबांना उद्धवनेच छळले!
By Admin | Updated: July 18, 2014 23:35 IST2014-07-18T23:08:33+5:302014-07-18T23:35:32+5:30
नारायण राणेंनी डागली तोफ : माझ्यावरील टीका थांबवा, अन्यथा ‘मातोश्री’मधील आतील गोष्टी बाहेर आणेन

बाळासाहेबांना उद्धवनेच छळले!
रत्नागिरी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कोणी सर्वाधिक छळले असेल तर उद्धव ठाकरे यांनीच. ते दोनवेळा घरही सोडून गेले होते. त्यांनी जर आपल्या विरोधात टीका करणे थांबविले नाही तर ‘मातोश्री’च्या आतील सगळ्या गोष्टी बाहेर आणेन आणि उद्धव ठाकरे यांचे वस्त्रहरण करेन, असा इशारा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला. सोमवारी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत, हे स्पष्ट करताना त्यांनी पुढील दिशा सांगण्यास मात्र नकार दिला. ते सोमवारी पत्रकार परिषदेनंतरच आपण जाहीर करू, असे त्यांनी सांगितले.
तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांनी आज, शुक्रवारी रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे पत्रकार परिषद घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला.
‘बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश नाही’, असे विधान उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केले आहे. पण, बाळासाहेबांचा सर्वाधिक छळ कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरे यांनीच केला आहे. ही गोष्ट तुम्ही ‘मातोश्री’वरील नोकर, शिवसेनेचे जुने नेते आणि ‘मातोश्री’च्या भिंतींना विचारा. दोनवेळा हा माणूस घर सोडून गेला होता आणि मुलाबाळांसह हॉटेल हॉलिडे इनमध्ये जाऊन राहिला होता. याच माणसाने बाळासाहेबांना सर्वाधिक छळले आहे. त्याला मी त्रास देणेही म्हणणार नाही. ते छळणेच होते,’ अशा शब्दांत राणे यांनी उद्धव यांच्यावर टीका केली.
कोकण भयमुक्त करण्याच्या ठाकरे यांच्या विधानावरही त्यांनी जोरदार टीका केली. कोकणात गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. तरीही उद्धव ठाकरे यांना कोकणातील जनता भयभीत झालेली कशी काय दिसते? कोकणच्या सुखदु:खात कधीच सहभागी न होणाऱ्या, कोकणच्या आर्थिक, सामाजिक प्रश्नांमध्ये कधीही सहभागी न होणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे कोकणात योगदान काय आहे? कोकणातील मासेमारी, कृषी याबाबत त्यांना काही ज्ञान आहे का? कोकणातील जनता भयभीत झाली आहे, असे त्यांना दिसत आहे; पण केंद्र सरकारने अल्पकालावधीत केलेली महागाई, रेल्वे भाडेवाढ त्यांना दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. शिवसेनेचे अनेकजण मोदी लाटेत अंघोळ करून खासदार झाले आहेत; पण शिवसेना ही नेतृत्वहीन संघटना आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींचा प्रभाव नसेल, असेही ते म्हणाले. आपण भाजपमध्ये जाणार आहोत आणि भाजपने आपल्याला घेऊ नये, असा सल्ला उद्धव ठाकरे भाजपला देत आहेत; पण ज्यांना स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्या पक्षावर बोलू नये, असेही ते म्हणाले. मंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी आपल्या भागातील लोकांसमोर जाण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांसमोर आपल्या भावना मांडण्यासाठी आपण हा दौरा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
सोमवारी उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा आपला निर्णय ठाम आहे. हा राजीनामा आपण का देत आहोत, हे आपण सोमवारीच जाहीर करू, असे राणे यांनी यावेळी सांगितले. आपण केवळ मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहोत. पक्षाचा राजीनामा देण्याचे विधान आपण कधीही केलेले नाही. त्यामुळे पुढे काय करणार, या प्रश्नाला अर्थच नाही, असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
स्वतंत्र पक्ष ? छे !
स्वतंत्र पक्ष काढण्याचा आपला अजिबात विचार नाही. इतक्या कमी वेळेत पक्ष काढून निवडणूक लढविता येत नाही. स्वतंत्र पक्ष काढण्याचा आपला कोणताही विचार नाही, असे राणे यांनी सांगितले. राज्यातील छोटे-छोटे पक्ष एकत्र करणार का, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, मी चिंध्या जमा करीत नाही आणि मला जमा करायच्याही नाहीत.
निष्ठावंतांवर अन्याय होतोय
काँग्रेसमधील निर्णय पद्धतीमुळे निष्ठावंतांवर अन्याय होत आहे, असे सूचक विधान त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केले.