शिल्लक : प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST2020-12-07T04:17:10+5:302020-12-07T04:17:10+5:30
कोल्हापूर : महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. लक्ष्मीपुरी, गांधीनगर परिसरांतील सात व्यावसायिकांवर शनिवारी ...

शिल्लक : प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांना दणका
कोल्हापूर : महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. लक्ष्मीपुरी, गांधीनगर परिसरांतील सात व्यावसायिकांवर शनिवारी (दि. ५) कारवाई करून प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे ३५ हजारांचा दंड वसूल केला. सुट्टीदिवशीच कारवाई केल्यामुळे शहरातील प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणारे, विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक सुशांत शेवाळे, स्वप्निल उलपे, नंदकुमार पाटील, मुकादम हेमंत कुरणे यांच्या पथकाने शनिवारी शहरातील दुकानांमध्ये अचानक भेटी दिल्या. यामध्ये सात व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर तसेच विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये सद्गुरू ट्रेडर्स, सागर प्लास्टिक, श्री महालक्ष्मी प्लास्टिक, साई सेल्स, निरंकारी स्टोअर्स, आरती प्लास्टिक, दत्त प्लास्टिक या दुकानांचा समावेश आहे.
प्रतिक्रिया
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर येथून पुढे कडक कारवाई केली जाणार आहे. कोणीही प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर, साठवणूक, विक्री करू नये अन्यथा दंडात्मक कारवाई केली आहे.
- जयवंत पोवार, मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिका