जयसिंगपुरमध्ये मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
By Admin | Updated: December 5, 2014 23:38 IST2014-12-05T20:51:50+5:302014-12-05T23:38:05+5:30
सर्व पक्षीय संघटनांचा आंदोलनाचा इशारा

जयसिंगपुरमध्ये मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
जयसिंगपूर : येथील संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आण्णासाहेब विभूते विद्यामंदिर आणि धरणगुत्ती हायस्कूलमधील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. या विरोधात शिवसेना, भाजप, राष्ट्र विकास सेना, रिपाइं, दलित सेनेसह सर्व पक्षांच्या संयुक्त शिष्टमंडळाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी विलास कांबळे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, या दोन्ही शाळांच्या शिक्षकांमध्ये आणि संस्थापक अध्यक्षांमध्ये वाद सुरू आहेत. या वादातून वारंवार विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार घडत आहेत. दरवर्षी आर्थिक देण्याचा व्यवहार होत असताना संस्थापक अध्यक्ष आडमुठेपणाचे धोरण अवलंबतात. मुख्याध्यापक आणि संस्थाध्यक्ष यांच्या संयुक्त खात्यावर शिष्यवृत्ती आणि दहावीच्या परीक्षा शुल्क परताव्याची रक्कम जमा होत असते. मुख्याध्यापक पैसे काढण्याच्या स्लिपवर स्वाक्षऱ्या करून अध्यक्षांच्या सहीसाठी पाठवितात; मात्र संस्थाध्यक्ष या स्लिपवर सही करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आर्थिक लाभांपासून वंचित राहत आहेत.
निवेदनावर संतोष जाधव, रतन शिकलगार, विठ्ठल पाटील, शंकर बिराजदार, अॅड. संभाजीराजे नाईक, सूरज भोसले, अरुण लाटवडे, जगदीश पाटील, साजिदा घोरी, संजय भोसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)