मुरगूडमधील नगरसेवक मुश्रीफांच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:18+5:302021-09-18T04:25:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुरगूड : केंद्रातील सत्तेच्या बळावर ईडीसारख्या संस्थांना हाताशी धरून महाविकास आघाडीच्या कार्यक्षम नेत्यांना ‘टार्गेट’ करणाऱ्या भाजपच्या ...

मुरगूडमधील नगरसेवक मुश्रीफांच्या पाठीशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरगूड : केंद्रातील सत्तेच्या बळावर ईडीसारख्या संस्थांना हाताशी धरून महाविकास आघाडीच्या कार्यक्षम नेत्यांना ‘टार्गेट’ करणाऱ्या भाजपच्या राजकीय कुरघोड्यांचा मुरगूडमधील नगरसेवकांनी जाहीर निषेध केला. तसेच याप्रकरणी मुश्रीफांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाच्या निषेधार्थ नगरसेवकांनी निषेध बैठक आयोजित केली होती.
यावेळी दलितमित्र डी. डी. चौगले म्हणाले, महाविकास आघाडी एकसंघपणे वाटचाल करत आहे. साम-दाम-दंड-भेद या मार्गाचा अवलंब करून भाजपला महाआघाडीचे सरकार उलथवून टाकायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील मंत्र्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून बदनाम करण्याचे कटकारस्थान भाजप सतत रचत आहे.
नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोरगरिबांच्या कल्याणासाठी पंधरा वर्षांत विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. तळागाळातील सर्वसामान्य माणसांसाठी राजकीय हयात खर्च करणाऱ्या मुश्रीफ यांना षड्यंत्र करून बदनाम करण्याच्या भाजपच्या राजकीय सुडबुद्धीचा निषेध करत असल्याचे सांगितले. या बैठकीला शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक नामदेव मेंडके, उपनगराध्यक्ष रंजना मंडलिक, नगरसेवक जयसिंगराव भोसले, दलितमित्र दत्ता चौगुले, माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग भाट, माजी नगरसेवक शिवाजीराव चौगले, दीपक शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
श्रावणबाळ पुरून उरतील
महाराष्ट्रात श्रावणबाळ अशी ओळख असणाऱ्या मंत्री मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपने रचलेले हे कटकारस्थान आहे. भाजपच्या कुटनीतीला यश येणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असाच प्रकार यापूर्वी घडला होता. त्या सगळ्याला श्रावणबाळ असलेले मंत्री मुश्रीफ पुरून उरले होते, असे नामदेवराव मेंडके यांनी सांगितले.