कोरोनाच्या आघाडीवर लढलेले लसीकरणामध्ये मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:46 IST2021-03-13T04:46:40+5:302021-03-13T04:46:40+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या काळात आघाडीवर लढलेले पोलीस, महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी लसीकरणामध्ये मात्र मागे पडले आहेत. ...

कोरोनाच्या आघाडीवर लढलेले लसीकरणामध्ये मागे
कोल्हापूर : कोरोनाच्या काळात आघाडीवर लढलेले पोलीस, महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी लसीकरणामध्ये मात्र मागे पडले आहेत. लसीकरण सुरू होऊन महिना होत आला तरी अजूनही या गटातील ४५ टक्के जणांनीच लसीकरण करून घेतले आहे.
गेल्या महिन्याच्या १६ तारखेपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला खासगी आणि सरकारी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. आरोग्य अधिकारी, कर्मचारी लसीकरणामध्ये पुढे असून ८० टक्के जणांनी लस घेतली आहे. ३८ हजार २५६ जणांना लस देण्याचे उद्दिष्ट असून त्यांपैकी ३० हजार ७०० जणांनी लस घेतली आहे.
यानंतरच्या टप्प्यात पोलीस, महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. यासाठी २९ हजार ८८९ इतके उद्दिष्ट ठेवण्यात आले. मात्र त्यापैकी फक्त १३ हजार ५२७ इतक्या जणांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ ४५ टक्के जणांचे लसीकरण झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांच्या वरील ते साठ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र ही संख्या मोठी असल्यामुळे आणि सुरुवातीला लसीकरणाची केंद्रे मर्यादित असल्यामुळे यालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. १ लाख ५२ हजार ९४८ जणांचे उद्दिष्ट असून त्यांपैकी ४८८५ जणांना लस देण्यात आली आहे. हे प्रमाण केवळ ३.२ टक्के आहे; तर ६० वर्षांवरील ५ लाख ९० हजार ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याची असून त्यांपैकी केवळ २७ हजार ९३८ जणांना लस देण्यात आली आहे.
चौकट
गट उद्दिष्ट झालेले लसीकरण
आरोग्य अधिकारी, कर्मचारी ३८२५६ ३०७००
पोलीस, महसूल, जि.प. अधिकारी, कर्मचारी २९८८९ १३५२७
४५ ते ६० वर्षांमधील नागरिकांना लसीकरण १,५२,९४८ ४८८५
६० वर्षांवरील नागरिकांना लसीकरण ५,९०,००० २७९३८
एकूण लसीकरण ७, ३०, ०९३ ७७०५०
चौकट
या ठिकाणी होते लसीकरण
प्राथमिक आरोग्य केंद्रे ७६
ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालये ३०
आयुर्वेदिक दवाखाने ९
महापालिका दवाखाने ११
खासगी दवाखाने ३०
चौकट
१ लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करता येते. यासाठी आशा, गावातील संग्राम कक्ष यांची मदत घेता येते.
२ ऑनलाईन आधी नोंदणी केली असेल तर आधार कार्ड दाखवून लसीकरण करून घेता येते.
३ आता नव्या सूचनांनुसार थेट लसीकरणाच्या ठिकाणी आधारकार्ड, मोबाईल घेऊन गेल्यानंतर लस घेता येते.
कोट
जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून कोविड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. आता ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. संबंधितांनी आपल्याजवळ असणाऱ्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये जाऊन लस घ्यावी. तसेच जिल्ह्यात ३० खासगी रुग्णालयांमध्येही ही सोय करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये ही सोय माेफत असून, खासगीमध्ये २५० रुपये आकारले जातात.
- डॉ. फारूक देसाई,
माता, बालक संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर