आयजीएम कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 01:04 IST2017-07-14T01:04:30+5:302017-07-14T01:04:30+5:30
एक महिन्याचा पगार : नगरविकास खात्याच्या पत्राची प्रतीक्षा

आयजीएम कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : आयजीएम दवाखान्याकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार देण्याच्या आश्वासनानंतर गुरुवारी ‘काम बंद’ आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत शासनाच्या नगरविकास खात्याकडून पगार देण्याबाबतचे पत्र ई-मेलद्वारे नगरपालिकेला मिळाले नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा अस्वस्थता वाढीस लागली आहे.
आयजीएम दवाखान्याचे शासनाकडे हस्तांतरण झाले असले तरी अधिकारी व कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापासूनचा पगार मिळाला नाही. त्यामुळे सोमवार (दि. १०) पासून दवाखान्याकडील डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले होते. अशा पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. १२) सायंकाळी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या कार्यालयात बैठक झाली. डॉक्टर व कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीपोटी एक महिन्याचा पगार ताबडतोब देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला नगरविकास खात्याकडून मंजुरी घ्यावी, असेही यावेळी ठरले होते.
वरील निर्णयाबाबत आमदार हाळवणकर यांनी नगरविकास खात्याचे सचिव परशुरामे यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली होती. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीपोटी एक महिन्याचा पगार नगरपालिकेने करावा, याबाबतचे मंजुरी पत्र गुरुवारी नगरविकास खात्याने ई-मेलद्वारे नगरपालिकेला द्यावे, असे आमदारांनी त्यांना सांगितले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी आयजीएमकडील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन मागे घेतले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत नगरविकास खात्याचे पत्र ई-मेलद्वारे मिळाले नसल्याने डॉक्टरसह कर्मचारी अस्वस्थ होते.
स्वाईन फ्लू कक्षाच्या स्थापनेचा प्रश्न अनुत्तरित
येथील गुलमोहर हौसिंग सोसायटीमधील सुरेखा गजरे यांचे स्वाईन फ्लूने दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आयजीएम दवाखान्याकडे स्वाइन फ्लू कक्षाची स्थापना ताबडतोब करणे आवश्यक होते. मात्र, दवाखान्याच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सुप्रिया देशमुख सध्या रजेवर आहेत. त्यांच्या गैरहजेरीत याबाबतचा निर्णय कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.