बच्चू हलवाई यांचे नाव मतदार यादीतून गायब
By Admin | Updated: March 12, 2015 00:08 IST2015-03-11T22:37:06+5:302015-03-12T00:08:41+5:30
तरुण भारत मंडळ निवडणूक

बच्चू हलवाई यांचे नाव मतदार यादीतून गायब
सांगली : तरुण भारत व्यायाम मंडळाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय कबड्डीपटू गोपालन गणपती हलवाई (बच्चूभाई हलवाई) यांचे नाव मंडळाने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या सभासद मतदार यादीतून वगळले आहे. या प्रकारामुळे दोन्ही गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. मंडळाच्या आजी-माजी खेळाडूंनी निषेध सभा घेऊन व रंगपंचमी न खेळता निषेध व्यक्त केला.
बच्चूभाई हलवाई हे मंडळाचे राष्ट्रीय कबड्डीपटू. बच्चूभार्इंची मैदानावर एन्ट्री पडली की भल्याभल्यांच्या उरात धडकी भरायची, असा एक काळ होता. विद्यमान संचालक मंडळाने निवडणुकीसाठी नुकतीच सभासद यादी प्रसिध्द केली. या यादीतून चक्क बच्चूभार्इंचे नावच वगळले होते.
मंडळाचे माजी अध्यक्ष असलेल्या एका ज्येष्ठ आणि वयस्कर सभासदास अशी वागणूक देणं कितपत योग्य आहे? असा सवाल मंडळाच्या काही सभासद कबड्डीपटूंनी मंडळाच्या कार्यालयात जाऊन विचारला. प्रकरण अंगलट येईल या भीतीने पुन्हा त्वरित बच्चूभार्इंचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले.
या प्रकाराबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी मंडळाच्या आजी-माजी खेळाडूंची निषेध सभा दीपकराव साठे यांच्या गणपती पेठेतील कार्यालयात पार पडली. सभेत खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय कबड्डीपटू भरत ताटे म्हणाले, मंडळाचे विद्यमान पदाधिकारी इतक्या खालच्या पातळीला जातील, असं कधीच वाटलं नाही. कबड्डीचे भीष्माचार्य म्हणून ज्यांची देशभर ख्याती आहे, त्या गुरूवर्य बच्चूभार्इंच्याबाबतीत हे कारस्थान करणं चुकीचं आहे.
विनायक विभूते म्हणाले, सच्च्या खेळाडूंची कदरच केली जात नाही. या सभेस भारतश्री रवींद्र आरते, अशोक शेट्टी, अमर गोटखिंडे, राहुल गोरे, अमर रजपूत, पुंडलिक चव्हाण, गणेश जाधव, किरण मोहिते, बापू चव्हाण, बसू स्वामी, अनिल चव्हाण, काका हलवाई, अरुण शेटे, उदय खोत, खंडेराव हलवाई, दिगंबर गायकवाड, भरत ताटे, हमीद शिकलगार, विदूर हलवाई आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)