‘बाबरी ते कणेरी’ म्हणजे अस्वस्थ चिंतन

By Admin | Updated: August 12, 2014 00:41 IST2014-08-12T00:32:46+5:302014-08-12T00:41:45+5:30

किशोर बेडकीहाळ : हिंदू-मुस्लिम यांच्यातील स्नेह, एकोपा हीच देशाची ताकद

'Babri Ka Kanari' means unhealthy contemplation | ‘बाबरी ते कणेरी’ म्हणजे अस्वस्थ चिंतन

‘बाबरी ते कणेरी’ म्हणजे अस्वस्थ चिंतन

कोल्हापूर : धर्मनिरपेक्षवादाचा मांडलेला आलेख, आजपर्यंतच्या घडामोडींचे विश्लेषण आणि भूतकाळाचे अस्वस्थ चिंतन म्हणजे ‘बाबरी ते कणेरी’ हे पुस्तक आहे. निराशेची किनार, अवस्थतेसह उद्याचे भविष्य या पुस्तकातून मांडण्यात आले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी आज, सोमवारी येथे केले.
हुमायून मुरसललिखित ‘बाबरी ते कणेरी : हिंदू-मुस्लिम ऐक्य संपवणारे राजकारण’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे होते. ‘आम्ही भारतीय’ लोक आंदोलन आणि हिंदी हैं हम... हिंदोस्ताँ हमारा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बेडकीहाळ म्हणाले, अत्यंत अस्वस्थ, संवेदनशील असणाऱ्या, लोकशाही मार्गाचा वापर करून पदरी निराशा पडलेल्या, एका अस्सल भारतीय लेखकाचे मनोगत या पुस्तकात आहे. त्याने याद्वारे धार्मिक स्थळे आणि मूलभूत हक्कांबाबत असलेली सामाजिक व्यथा मांडली. हे पुस्तक भयग्रस्ततेचे सूचक आहे शिवाय आपला व्यवहार धर्मनिरपेक्षपणे सुरू नसल्याची शोकांतिकादेखील त्याद्वारे जाणवते.
पानसरे म्हणाले, सध्या प्रतिगामी शक्ती सत्तेत आली आहे. अशा परिस्थितीत हिंदू-मुस्लिमांनी अफवांना बळी पडू नये. त्याबाबत त्यांनी दक्ष रहावे. सध्या परिस्थिती बदलली असून, विचारांनी उत्तर देण्याची गरज आहे. इतिहासाचा वापर हत्यारासारखा करणे आवश्यक आहे.
मुरसल म्हणाले, एकीकडे ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ म्हटले जाते. त्याचवेळी उत्तर प्रदेशमध्ये ६०५ धार्मिक दंगली झाल्याचे उघडकीस येते. मग, हे काय अच्छे दिन आहेत. कोल्हापुरातील शाहूनगरमध्ये घरामध्ये, कणेरी मस्जिदमध्ये नमाज पठणाला विरोध केला जातो. असे प्रकार हे मूलभूत हक्कांचे हनन करणारे आहेत. हिंदू-मुस्लिमांतील स्नेह, एकोपा ही देशाची ताकद असून, ती सध्या वाढविण्याची गरज आहे.
कार्यक्रमास बाळ पोतदार, संपत देसाई, हुमायून मुरसल, प्रा. जे. बी. शिंदे आदी उपस्थित होते. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत यादव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Babri Ka Kanari' means unhealthy contemplation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.