‘गोकुळ’च्या तज्ज्ञ संचालकपदी बाबा देसाई, रामराजे कुपेकर

By Admin | Updated: July 31, 2015 01:01 IST2015-07-31T01:01:38+5:302015-07-31T01:01:38+5:30

बैठकीत ठराव : सत्यजित पाटील स्वीकृत संचालक

Baba Desai, Ramraje Kupekar, as the expert director of Gokul, Ramraje Kupekar | ‘गोकुळ’च्या तज्ज्ञ संचालकपदी बाबा देसाई, रामराजे कुपेकर

‘गोकुळ’च्या तज्ज्ञ संचालकपदी बाबा देसाई, रामराजे कुपेकर

 
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या स्वीकृत संचालकपदी कसबा बीडचे सत्यजित पाटील, तर तज्ज्ञ संचालकपदी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई व कानडेवाडी (ता. गडहिंग्लज)चे रामराजे कुपेकर यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली.
गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील ‘गोकुळ’ प्रकल्प येथील प्रधान कार्यालयात संघाचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीत संचालक नियुक्तीचे ठराव झाले.
गुरुवारच्या बैठकीच्या अजेंड्यावर तज्ज्ञ संचालक व संचालक नियुक्ती हा विषय होता. त्यानुसार दिवंगत संचालक सुरेश पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालकपदाच्या जागेवर त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटील यांना स्वीकृत करण्यात आले. तसेच संचालक मंडळावरील अन्य दोन तज्ज्ञ संचालकपदी पुष्पनगर (ता. भुदरगड, सध्या रा. कळंबा) येथील भाजपचे ज्येष्ठ नेते विजय ऊर्फ बाबा देसाई व कानडेवाडी येथील रामराजे देसाई-कुपेकर यांची निवड करण्यात आली.
सत्यजित पाटील यांचे नाव संचालक रवींद्र आपटे यांनी सुचविले, त्यास संचालक रणजितसिंह पाटील यांनी अनुमोदन दिले. बाबा देसाई यांचे नाव संचालक अरुण डोंगळे यांनी सुचविले, त्यास संचालक पी. डी. धुंदरे यांनी अनुमोदन दिले; तर रामराजे कुपेकर यांचे नाव संचालक अरुण नरके यांनी सुचविले, त्यास संचालक विश्वास जाधव यांनी अनुमोदन दिले. महादेवराव महाडिक व माजी आमदार पी. एन. पाटील यांनी संचालक व तज्ज्ञ संचालक पदासाठी नावे निश्चित केल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
स्वीकृत संचालक पदासाठी माजी अध्यक्ष दिलीप पाटील, अ‍ॅड. सुरेश कुराडे व रामराजे कुपेकर यांनी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले होते. आमदार महादेवराव महाडिक हे हातकणंगले तालुक्याला प्रतिनिधित्व देण्याबाबत आग्रही होते. परंतु, खा. धनंजय महाडिक हे मेहुणे कुपेकर यांच्यासाठी आग्रही राहिले. निवडणुकीवेळी कुपेकर यांना पॅनेलमध्ये घेण्यासाठी खा. महाडिक आग्रही होते. परंतु, त्यावेळची राजकीय समीकरणे पाहता त्यांना पॅनेलमध्ये घेता आले नाही. त्यामुळे स्वीकृत संचालक पदावर तरी त्यांना संधी मिळावी, यासाठी अखेरपर्यंत ते आग्रही राहिले. गुरुवारी सकाळी आ. महाडिक व पी. एन. पाटील यांच्यात बैठक होऊन झालेल्या घडामोडीनंतर कुपेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
‘गडहिंग्लज’ला प्रतिनिधित्व
‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिवंगत राजकुमार हत्तरगी यांच्या रूपाने गडहिंग्लज तालुक्याला प्रतिनिधित्व होेते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव सदानंद हत्तरगी यांना सत्तारूढ गटातून तिकीट मिळाले होते, परंतु त्यांचा पराभव झाल्याने या तालुक्याला प्रतिनिधित्व नव्हते. आता मात्र रामराजे कुपेकर यांच्या रूपाने गडहिंग्लजला प्रतिनिधित्व मिळाले आहे. तसेच कुपेकर यांच्या नियुक्तीने खा. महाडिक यांच्या गटाचाही ‘गोकुळ’मध्ये प्रवेश झाला आहे.(प्रतिनिधी)
 

Web Title: Baba Desai, Ramraje Kupekar, as the expert director of Gokul, Ramraje Kupekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.