शिक्षणाच्या वाटेवर आयुष्याभराचा अंधार!
By Admin | Updated: July 31, 2015 21:27 IST2015-07-31T21:27:01+5:302015-07-31T21:27:01+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : म्हसवेजवळील कातकरी वस्तीवर नाही वीज

शिक्षणाच्या वाटेवर आयुष्याभराचा अंधार!
संतोष कणसे- शाहूपुरी -येथून जवळच असणाऱ्या कातकरी वस्तीवर गेल्या पाच वर्षांपासून वीज नाही. त्यामुळे येथील मुलांना अनेक दिव्यातून वाट काढत आपले भविष्य सफल करण्यासाठी धडपडावे लागत आहे. वस्तीच्या रूपातच शिक्षणाच्या वाटेवरच अंधार असल्याने या मुलांचे भवितव्य अधिकच अंधारात गुडूप होत चालले असल्याचे दिसून येत आहे.
सातारा शहराजवळील म्हसवे परिसरात कातकरी समाज मोठ्या प्रमाणावर असून, मासेमारी हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. येथील रस्त्याच्या बाजूस गेल्या पाच वर्षांपासून काही कुटुंबे आपल्या झोपड्या टाकून राहत आहेत. आपल्या चिमुरड्यांसह त्यांना पावसाळ्याचा व थंडीचा सामना करावा लागत आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी या कुटुंबातील महिला व पुरुषांनी फाटक्या कपड्यांचा आधार घेऊन कसेबसे झोपड्या तयार केल्या आहेत. वळणाच्या रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात झोपड्या असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. रात्री सोसाट्याच्या वाऱ्याने झोपडीत राहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडतो. या झोपड्यामध्ये किमान पन्नास ते साठजण राहत आहेत. त्यात काही मुलांचाही समावेश आहे. येथील वीस ते पंचवीस चिमुरडे म्हसवे येथील शाळेत जातात; परंतु या वस्तीवर चारही बाजूने अंधारच अंधार आहे. या वस्तीवर किंवा परिसरात वीज दिसून येत नाही. अनेक मुले दिवे लावून अभ्यास करीत असतात.
ही वस्ती नदीच्या जवळ असल्यामुळे सायंकाळी जनावरांचा वावर असतो. त्यामुळेही मुलांचे जीवन धोक्यात आले आहे.
आम्ही येथे पाच वर्षांपसून राहत आहे. आमच्या वस्तीवर वीज नसल्याने मुलांना अभ्यासही करता येत नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारचे सणसुध्दा करता येत नाहीत. मोबाइल चार्जिंग करायचा म्हटलं तरी आम्हाला दुसऱ्याच्या घरी किंवा दुकानात जावे लागते. आम्हाला वस्तीवर सौरऊर्जा दिवे तरी बसवून द्यावेत. भविष्यात आमची मुलं काहीतरी बनावीत, असे आम्हाला वाटते.
- शिवाजी वाघे, रहिवासी