आयुर्वेद ही निसर्गनियमाप्रमाणे उपचार करणारी पद्धत
By Admin | Updated: December 15, 2014 00:24 IST2014-12-15T00:21:46+5:302014-12-15T00:24:09+5:30
मुक्त संवाद : इटलीचे डॉ. योर गुगलीलमी यांचे मत; स्थानिक प्रदेशांतील वनस्पतीने चांगले परिणाम

आयुर्वेद ही निसर्गनियमाप्रमाणे उपचार करणारी पद्धत
कोल्हापूर : आयुर्वेद ही निसर्गनियमांप्रमाणे उपचार करण्याची चांगली पद्धती आहे. मात्र, या उपचारपद्धतीची प्रचार व प्रसार हा फक्त भारतापुरताच मर्यादित राहिला आहे. त्याचा प्रचार जगभर होणे गरजेचे आहे. मात्र, स्थानिक प्रदेशांतील वनस्पतीद्वारे ही उपचारपद्धती केल्यास चांगले परिणाम दिसून येतात, असे मत इटलीचे डॉ. योर गुगलीलमी यांनी केले.
दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे आज, रविवारी वनौषधी विद्यापीठ संस्थेच्यावतीने सुरू असलेल्या आठव्या पॅनासिआ आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेच्या निमित्ताने आयोजित मुक्त संवादात ते बोलत होते.
मुक्त संवादामध्ये बेल्जियमचे पास्कल डुआॅट, सर्बियन असोसिएशन आॅफ आयुर्वेदचे अध्यक्ष डॉ. ब्रॅको सिसिक, इटलीचे डॉ. योर गुगलीलमी, मलेशियाच्या अरोमा थेरपिस्ट निओल सम सम ली, जपानच्या सौंदर्यउपचारतज्ज्ञ मिडोरी शिओनी, दुबईचे डॉ. सतीशकुमार आणि सीमा नागासावा हे सहभागी झाले होते.
याप्रसंगी गुगलीलमी म्हणाले,भारतामधून वनस्पती घेऊन जाऊन तिथे उपचार करण्यापेक्षा स्थानिक वनस्पतींचा वापर करून उपचारपद्धती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहेत तसेच भारतामधून आयुर्वेदांना घेऊन जावून त्यांच्याकडून आमच्या लोकांना प्रशिक्षण देण्याचा विचार करत आहे.
दुबईचे डॉ. सतीशकुमार म्हणाले, श्री महालक्ष्मीचे अधिष्ठान असलेल्या कोल्हापूरला एक वेगळे भौगोलिक महत्त्व आहे. पंचगंगेच्या तीरापासून महालक्ष्मी मंदिर हे विशिष्ट अंतरावर असून तेथील सकारात्मक ऊर्जेचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे नव्याने वाढलेल्या शहरापेक्षा जुने कोल्हापूर अधिक निरोगी आहे. ‘आयुर्वेद अँड जिआॅग्राफिकल रिलेशन वुईथ पिलग्रिम्स अँड ऐन्सिएंट टेम्पल्स’ या विषयावरील संशोधन पत्रिका सादर केली.
निओल सम सम ली म्हणाल्या, महर्षी अरोमा थेरपीवर मोठ्या प्रमाणात संशोधन होत असून केवळ गंध ज्ञानातून अनेक आजार बरे होऊ शकतात. अँटीबायोटिक्सपेक्षाही हे उपचार प्रभावी ठरतात.
मिडोरी शिओनी यांनी जपानमध्ये प्रचलित असलेल्या सौंदर्य आणि आरोग्यविषयक प्रवाहावर संवाद साधला. त्या म्हणाल्या, भारतातील विविध उपचारपद्धती आणि जपानमधील उपचारपद्धतींचा सुंदर मिलाफ घडवून अधिक चांगल्या पद्धती विकसित करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
डॉ. ब्रॅको सिसिका म्हणाले, इंडो-युरोपियन अकॅडमी आॅफ आयुर्वेद, महर्षी कॉलेज आॅफ परफेक्ट हेल्थ या नवीन अकॅडमीच्या माध्यमातून आयुर्वेद प्रचारासाठी विविध संकल्पना राबवणार असल्याचे सांगितले. येत्या एप्रिलमध्ये त्यासाठी पहिली जागतिक परिषद घेणार असून अकॅडमीचे भारतातील केंद्र हे वनौषधी विद्यापीठ संस्था असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. गुगलीलमी म्हणाले, महर्षी महेशयोगी यांनी पश्चात जगाला आयुर्वेदाची ओळख करून दिली. महर्षी युरोपियन रिसर्च युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.
दरम्यान, परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज बेल्जियमच्या पास्कल डुआॅट यांनी न्यू फिजिक्स आॅफ आयुर्वेद, साताऱ्याचे डॉ. आनंद ओक, कराडच्या डॉ. नचिकेत वाचा सुंदर व डॉ. सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केले. राज्यभरातून आलेल्या डॉक्टरांनी १७ शोधप्रबंध सादर केले. सायंकाळी परिषदेचा सांगता समारंभ झाला.