बँकेसाठीच आयाराम-गयाराम एकत्र
By Admin | Updated: November 10, 2014 00:44 IST2014-11-10T00:12:55+5:302014-11-10T00:44:38+5:30
शिक्षक बँक राजकारण : राजाराम वरुटे यांची एस. डी. पाटील, थोरातांवर टीका

बँकेसाठीच आयाराम-गयाराम एकत्र
कोल्हापूर : शिक्षक बँकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून संभाजीराव थोरात व एस. डी. पाटील यांनी आयाराम-गयारामांची फौज एकत्र केली आहे; पण गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळे बँकेचे सभासद अशा प्रवृत्तीला थारा देणार नाहीत, अशी टीका राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी केली. आपल्या नेतृत्वाखाली संघच अधिकृत असून, त्याला शासनमान्यता असल्याचा दावाही त्यांनी केला.
प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखेच्या आज, रविवारी कोल्हापुरात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. संघाच्या पावणेदोन वर्षांच्या व बँकेच्या पाच वर्षांतील कामाचा आढावा घेत राजाराम वरुटे
यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. राज्याध्यक्ष झाल्यानंतर अल्पावधीतच शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या, आपसी बदल्यांचा प्रश्न मार्गी लावला; पण नेतेमंडळींना शिक्षकांच्या प्रश्नांपेक्षा पहिल्यांदा आपले हित पाहिल्याने आपल्याबरोबर मतभेद निर्माण झाले. त्यातूनच हकालपट्टीचे सत्र सुरू झाले. हुकूमशाही व पैशांच्या मागणीला कंटाळूनच आपण राज्याध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट वरुटे यांनी केला.
आज थोरात यांनीही कागल तालुक्यात मेळावा आयोजित केला आहे. तरीही शिक्षकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास पाहिला
तर शिक्षक कोणाकडे जास्त हे
सिद्ध होते.
वसंतराव हारुगडे म्हणाले, ‘खोटे बोल, पण रेटून बोल’, अशी प्रवृत्ती संभाजीराव थोरात यांची आहे. जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात मेळावा घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. अविचारी माणसांबरोबर थोरात महाराष्ट्रात फिरत असल्याने त्यांना फारशी किंमत नाही. १९६८ पासून शिक्षक संघात काम करत असल्याने सगळ्या नेत्यांच्या कुंडल्या आपल्याकडे आहेत; पण समाजात शिक्षकांची प्रतिमा चांगली राहण्यासाठीच गप्प असल्याचे दामोदर सुतार यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुख्यालयी राहण्याच्या अटीबाबत फेरविचार करण्याचे आश्वासन अध्यक्ष पाटील यांनी दिले. संभाजी कदम यांनी स्वागत केले. संघाचे जिल्हाध्यक्ष नामदेव रेपे यांनी प्रास्ताविक केले. पी. के. पाटील, वसंत जोशीलकर, बंडू संकेश्वरे, दिलीप बच्चे, बी. एस. पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
त्यावेळचा त्यांचा
तोरा उतरला !
जयंत पाटील ग्रामविकास मंत्री असताना एस. डी. पाटील यांचा तोरा काही औरच होता. सरकार बदलल्याने त्यांचा तोरा उतरला असून, आता त्यांना काही काम नसल्याने त्यांनी बँकेसाठी प्रयत्न सुरू केल्याचा आरोप वरूटे यांनी केला.
एस. डी. पाटील यांनी
नोकरीसाठी पैसे गोळा केले
शिक्षक बँकेत नोकरी लावतो म्हणून एस. डी. पाटील यांनी अनेक मुलांकडून पैसे घेतले होते. पाच वर्षांत भरती करणार नसल्याचे वचन सभासदांना दिले, मग पैसे कशासाठी घेतले, अशी विचारणा त्याच्याकडे केल्यानंतर तंबीची भाषा सुरू केली, असा गौप्यस्फोट करत अशा माणसाबरोबर राहायचे काय? असा सवाल त्यांनी केला.