पेठ वडगावात अस्ताव्यस्त पार्किंग, वाहतूक कोंडी नित्याचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST2020-12-05T04:54:40+5:302020-12-05T04:54:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क/ सुहास जाधव, पेठवडगाव : वडगाव शहरामध्ये वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली ...

पेठ वडगावात अस्ताव्यस्त पार्किंग, वाहतूक कोंडी नित्याचीच
लोकमत न्यूज नेटवर्क/ सुहास जाधव, पेठवडगाव : वडगाव शहरामध्ये वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. शहरातील पालिका चौक, बिरदेव चौक, गांधी चौक तसेच पद्मा रोड व धान्य लाईन बाजारपेठ, आदी महत्त्वाच्या रस्त्यांवर जागा मिळेल तिथे अस्ताव्यस्त पार्किंग केले जात आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न भेडसावत असून नगरपालिका व पोलिसांनी संयुक्त बैठक घेऊन पार्किंगसाठी मास्टर प्लॅन बनविण्याची गरज आहे.
वडगाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी घडामोडीचे महत्त्वाचे शहर आहे. परिसरातील हक्काची बाजारपेठ असल्याने नागरिकांची मोठ्या संख्येने शहरात ये-जा होत असते. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांचे प्रमाण वाढले आहे. कोकणसह ग्रामीण भागातून विविध वस्तूंची आवक-जावक शहरातून होत असते. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंगबाबत नुसते फलक लावलेले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने पार्किंगची समस्या मोठी होऊ लागली आहे.
बसस्थानक, विजयसिंह यादव चौक, पालिका चौक, मार्केट यार्ड रोड, आदी ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असते. बसस्थानकासमोर रस्त्यावर अतिक्रमणे झाल्यामुळे या रोडवर पादचाऱ्यांना चालणेदेखील कठीण होऊन बसले आहे. शहरातील अनेक रस्ते अरुंद असून या रस्त्यावर आपत्कालीन व्यवस्था पुरविणे जिकिरीचे आहे. बुधवारी तुकाईनगरमध्ये उसाला आग लागली होती. येथे अग्निशमन दल तत्काळ पोहोचले. मात्र, अरुंद रस्ते असल्यामुळे रिव्हर्सने अग्निशमन गाडी मागे घेण्याची नामुष्की आली. शहरातील अनेक नव्या व्यापारी संकुलाला पार्किंगची सोय नसल्याने बहुतांश वाहने ही रस्त्यावरच लावली जातात. पालिकेकडून मंजूर केलेल्या प्लॅनमध्ये काहींनी पार्किंग दाखवूनही नंतर मूळचा प्लॅन बदलल्याचे दिसते. अशांवर पालिका प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न आहे.
पार्किंगसाठी जागा नसल्यानेच चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. याचा त्रास वाहतुकीला होत असून शहरातील आंबा रोड, डाॅ. आंबेडकर चौक, पालिका चौक, यादव चौक, बिरदेव चौक, हनुमान रोड येथे वारंवार वाहतुकीची कोंडी होते. पार्किंगबाबत अनेकवेळा केवळ चर्चा झाली आहे. मात्र, पोलीस व पालिका प्रशासनाने कोणतीही ठोस योजना केलेली नाही. रस्त्यावर फिरुन व थांबून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना रस्ता हा पादचारी, वाहतुकीसाठी असतो. हे सांगून शिस्त लावणे गरजेचे आहे. सुरळीत वाहतुकीसाठीची जबाबदारी पोलीस व पालिकेची आहे. मात्र, ठोस उपाययोजना होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आता पालिकेने पार्किंगबाबतचा मास्टरप्लॅन बनवावा, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे
फोटो ओळ 1.पेठवडगाव: येथील तुकाईनगर येथे आपत्तीमध्ये कसरत करून अग्निशमन गाडी नेताना पालिका कर्मचारी. (छाया : क्षितिज जाधव)
2. पेठवडगाव: येथील बिरदेव चौकात एक दिशा मार्गातून जाताना अशी अवजड वाहनांना कसरत करावी लागते. (छाया : क्षितिज जाधव)