आवळे-आवाडेंची सावध भूमिका
By Admin | Updated: November 20, 2015 00:56 IST2015-11-20T00:56:00+5:302015-11-20T00:56:30+5:30
विधानपरिषद तिकीट वाटप : पक्ष म्हणून भूमिका काय? भविष्यातील राजकारणाचा विचार

आवळे-आवाडेंची सावध भूमिका
आयुब मुल्ला --खोची---विधानपरिषदेच्या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील यांच्यात प्रचंड संघर्ष होणार हे स्पष्ट आहे. तिकीट वाटपाच्या पहिल्या टप्प्यातच माजी खासदार जयवंतराव आवळे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी भविष्यातील राजकीय अडथळ्यांचा अंदाज घेऊन सावध भूमिका घेतली आहे. त्यांना महाडिक-पाटील या दोन्हींचा रोष ओढवून घ्यावयाचा नाही, हे स्पष्टच आहे. परंतु, काँग्रेस म्हणून दोघांनीही ठाम भूमिका घेऊन आपली भूमिका मांडली पाहिजे; नाही तर तिकीट वाटपानंतर दोघांपैकी कोणाला तरी स्वीकारावेच लागणार आहे. राज्यात ज्येष्ठांच्या यादीत काँग्रेस पक्षात आवळे यांचा वरचा नंबर आहे. पक्षनिष्ठा आणि ज्येष्ठत्व यांचा विचार करता त्यांचा शब्द पक्षात मानला जातो. विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतंत्रपणे प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली आहे.
आ. महाडिक-सतेज पाटील यांच्याबरोबर भेटीस गेलेले नाहीत. यामागे दोघांपैकी कोणीतरी नाराज होईल, अशी त्यांची भावना आहे. तिसरे इच्छुक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याबरोबर त्यांची मैत्री आहे. त्यांच्यासाठी ते श्रेष्ठींना समर्थन देतीलही. परंतु, पहिल्या दोन इच्छुकांबाबत स्पष्ट भूमिका मांडणार नाहीत.
प्रकाश आवाडेंना सुद्धा ते अंतर्गत विरोध करतील, अशी वस्तुस्थिती आहे. तर दुसऱ्या बाजूला मी सर्वांबरोबर आहे, हेच त्यांना मांडता येणार नाही. प्रकाश आवाडेंचे तसे काँग्रेसअंतर्गत जयवंतराव आवळे, पी. एन. पाटील हे प्रखर विरोधक आहेत.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व ‘केडीसीसी’ बँक उपाध्यक्ष निवडीत ते दिसून आले आहे.
या दोन्हीप्रसंगी त्यांच्यासोबत ना महाडिक राहिले, ना सतेज पाटील. याचाही राग त्यांच्या मनात आहे. यातूनच त्यांनी विधानपरिषदेसाठी इच्छुक असल्याची घोषणा केली; पण घोषणा करून त्यांनी फारशी धडपड केलेली नाही. इचलकरंजी नगरपालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला पाठविले व स्वत: परदेश दौऱ्यावर गेले आहेत. यातून त्यांची तिकीट मिळाले पाहिजे यातील तळमळ दिसून येते.
ज्यांना उमेदवारी पाहिजे ते विद्यमान आमदार महाडिक हे तर बुधवारी सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. सतेज पाटील - पी. एन. पाटील मुंबईत आहेत. यावरून स्पर्धा दिसते. या स्पर्धेत आता कोण टिकणार व यशस्वी होणार, हे लवकरच समजेल. यातून काँग्रेसअंतर्गत गटाची बांधणी होणार हे स्पष्ट आहे. याचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होईल. परंतु, आपल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा त्रास होऊ नये याची काळजी मात्र आवळे-आवाडे घेत आहेत.
अशा चालू असलेल्या घडामोडींत आता अंतिम निर्णयाचा चेंडू दिल्ली दरबारी गेला आहे. प्रकाश आवाडे इच्छुक असणे, प्रदेशाध्यक्षांना न भेटणे, तर आवळे प्रदेशाध्यक्षांना स्वतंत्र भेटणे यापाठीमागे त्यांची प्रारंभीच्या टप्प्यातील भूमिका सावध अशीच आहे. उघड भूमिका घेऊन समर्थनाची भाषा त्यांनी टाळली आहे. पक्षाचा आदेश मानू, एवढ्यावरच ते थांबतात; पण वास्तव स्वीकारून स्पष्ट भूमिका मांडली तरच त्यांचे राजकारण भक्कम होईल; अन्यथा अडथळ्यांचा सामना त्यांना करावाच लागेल. महाडिक-पाटील हे तेवढ्या तयारीचे आहेत.
तिकिटाच्या प्रक्रियेत सहभागी असणारे महाडिक - सतेज पाटील - पी. एन. पाटील - प्रकाश आवाडे व इच्छुक नसलेले परंतु पक्षदरबारी वजन असलेले जयवंतराव आवळे हे पाचजण आहेत. यातील तिघे हातकणंगले तालुक्यातील आहेत. त्यापैकी महाडिक हे प्रबळ दावेदार आहेत.