अंबाबाई मंदिरात शतचंडी अनुष्ठानची सांगता
By Admin | Updated: June 30, 2015 00:21 IST2015-06-30T00:10:32+5:302015-06-30T00:21:53+5:30
अधिक मास : देवीला अवभृत स्नान, नौकाविहार

अंबाबाई मंदिरात शतचंडी अनुष्ठानची सांगता
कोल्हापूर : अधिक मासानिमित्त आयोजित शतचंडी अनुष्ठानची सोमवारी सांगता झाली. यानिमित्त अंबाबाईच्या उत्सवमूर्तीस पंचगंगा घाटावर अवभृत स्नान व जलपरिक्रमा (नौकाविहार) करण्यात आली.
करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्यावतीने अधिक मासानिमित्त रविवारपासून दोन दिवसीय शतचंडी अनुष्ठानचे आयोजन करण्यात आले होते. या अनुष्ठानात सोमवारी लक्ष्मी व भवानी सहस्त्रनाम, कुंकुमार्चन नंतर पूर्णाहुती हे विधी करण्यात आले. त्यानंतर अंबाबाईची उत्सवमूर्ती पालखीतून महाद्वार रोड, गंगावेश मार्गे पंचगंगा घाटावर नेण्यात आली. येथे पंचगंगेचे पूजन करून उत्सवमूर्तीस अवभृत स्नान विधी करण्यात आला. त्यानंतर नौकाविहार करण्यात आला. पूजाविधी प्रसाद निगुडकर व रवी माईणकर यांनी केले. यावेळी माधव मुनीश्वर, मनोज मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, केदार मुनीश्वर, गजानन मुनीश्वर, यांच्यासह श्रीपूजक उपस्थित होते. (प्रतिनिधी)