कोकणी साहित्याचे भीष्माचार्य केळेकर यांना पुरस्कार अर्पण
By Admin | Updated: December 19, 2014 23:22 IST2014-12-19T23:10:46+5:302014-12-19T23:22:54+5:30
माधवी सरदेसाई : साहित्य अकादमीकडून गौरव

कोकणी साहित्याचे भीष्माचार्य केळेकर यांना पुरस्कार अर्पण
पणजी : आपल्याला जे गवसले ते सुलभ भाषेतून इतरांसमोर मांडताना या साहित्याच्या मननातून संशोधनाच्या वाटेवरून जाण्याची प्रेरणा इतरांनाही मिळावी, हाच हेतू आपण बाळगून आहोत, अशी भावना ‘मंथन’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा यंदाचा कोकणी भाषेसाठीचा पुरस्कार मिळालेल्या डॉ. माधवी सरदेसाई यांनी व्यक्त केली.
लेखक आणि वाचकाचे ऋणानुबंध जुळले नाहीत तर लेखनामागचा साहित्यिक हेतू
साध्य होत नसतो याकडे निर्देश
करत त्यांनी हा पुरस्कार कोकणी साहित्याचे भीष्माचार्य आणि परखड विवेचक रविन्द्र केळेकर यांना अर्पण केला.
‘मंथन’व्यतिरिक्त भासाभास (भाषाशास्त्रविषयक संशोधन), एका विचाराची जीवित कथा (भाषांतर - ललित), माणकुलो राजकुंवर (फ्रेंच बालकादंबरीचे भाषांतर) अशी पुस्तके सरदेसाई यांनी लिहिली असून, ‘जाग’ या नियतकालिकातून त्यांचे
लेखन नियमित प्रसिद्ध होत असते. कोकणी भाषा, साहित्य आणि भाषाशास्त्रावरही त्यांनी विपुल लेखन केले आहे.
भाषा, साहित्य, अस्मिता, शिक्षण, राजकारण, इतिहास आणि वसाहतवादासारख्या विभिन्न विषयांना स्पर्श करणाऱ्या त्यांच्या ‘मंथन’ या पुस्तकाला संशोधनाचेही परिमाण लाभले आहे. मार्च २०१२ मध्ये ते प्रकाशित झाले होते. डॉ.
सरदेसाई यांना या आधी साहित्य अकादमीचा भाषांतराचा पुरस्कारही लाभला आहे.
कथा, कविता, ललित अशा विविध साहित्य प्रकारांत मुशाफिरी करणाऱ्या माधवी सरदेसाई हल्ली साहित्यविषयक संशोधनातच रमल्या आहेत. (प्रतिनिधी)