प्रबोधनाचा सूर्य अस्ताला..!

By Admin | Updated: February 22, 2015 01:05 IST2015-02-22T00:55:39+5:302015-02-22T01:05:16+5:30

अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी : कॉम्रेड पानसरें को लाल सलाम..; अण्णांचे अधुरे काम पूर्ण करण्याची शपथ

The awakening of the solar ostra ..! | प्रबोधनाचा सूर्य अस्ताला..!

प्रबोधनाचा सूर्य अस्ताला..!

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या डाव्या व पुरोगामी चळवळीतील पितामह, सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी चंदनाप्रमाणे झिजणारा लढवय्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी येथील पंचगंगा मुक्तिधाममध्ये कोणताही विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या या लाडक्या नेत्याला साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण केली. मावळतीला गेलेल्या सूर्याच्या साक्षीने हा महाराष्ट्राच्याच नव्हे देशाच्या प्रबोधनाच्या चळवळीतील सूर्यही कायमचा लुप्त झाला.
अंत्यसंस्कारास जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी मुठी आवळल्या. ‘कॉम्रेड गोविंद पानसरे को लाल सलाम..लाल सलाम..’ अशी आरोळी दिली. आपले लाडके अण्णा आता पुन्हा कधीच भेटणार नाहीत, या सत्याने अनेकांचा बांध फुटला. पंचगंगेला महापूर यावा तसाच अश्रूंचा लोट मने रिती करून गेला. स्मशानभूमीतून पाय काढताना प्रत्येकाच्या मनांत आपण कधीच भरून येवू शकणार नाही असे काहीतरी गमावून घरी परतत असल्याची भयाण रुखरुख सोबत राहिली. सांगा हिटलरवाद्यांनो, तुम्ही अजून मुडदे पाडणार किती...? अशी शाहिराने केलेली विचारणा अण्णांच्या दु:खाचीही उंची वाढवून गेली.
पानसरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दसरा चौक मैदानावर अलोट गर्दी उसळली. अवघ्या कोल्हापूरकरांनी कडकडीत बंद ठेवून पानसरे यांना अखेरचा लाल सलाम केला. शुक्रवारी रात्री गोविंद पानसरे यांच्या निधनाची बातमी येथे पोहोचली आणि अवघे कोल्हापूर शोकसागरात बुडाले. तेव्हापासून पानसरे यांचे पार्थिव कोल्हापुरात केव्हा आणणार याची प्रतीक्षा लागून राहिली होती.
दसरा चौक मैदानावर हजारोंचा जनसमुदाय हुंदके देत पार्थिवाच्या प्रतीक्षेत होता. ही प्रतीक्षा पार्थिव घेऊन आलेली रुग्णवाहिका पाहून दुपारी सव्वा वाजता संपली आणि उपस्थितांतून ‘अमर रहे, अमर रहे, गोविंद पानसरे अमर रहे’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. गेली पासष्ट वर्षे कोल्हापूरसह राज्यातील रस्त्यावर संघर्ष करणारा आपला नेता निस्तेज पडलेला पाहून जनसमुदायाला आपल्या भावनांना आवर घालणे केवळ अशक्य झाले. ‘रडायचं नाही’ असं सांगूनही कार्यकर्त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत एकमेकांच्या खांद्यावर मान ठेऊन भावनांना वाट करून दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The awakening of the solar ostra ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.