‘महात्मा फुले समग्र वाङ्मया’ची प्रतीक्षा

By Admin | Updated: November 28, 2014 00:01 IST2014-11-27T23:42:15+5:302014-11-28T00:01:34+5:30

स्मृतिदिन विशेष : समितीकडून प्रकाशन नाही, सव्वा वर्ष उलटले; संचालनालयाकडूनच ग्रंथांची मागणी

Awaiting 'Mahatma Phule Composite Literature' | ‘महात्मा फुले समग्र वाङ्मया’ची प्रतीक्षा

‘महात्मा फुले समग्र वाङ्मया’ची प्रतीक्षा

संतोष मिठारी - कोल्हापूर ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’ या ग्रंथाची कोल्हापूरकर गेल्या सव्वा वर्षापासून प्रतीक्षा करीत आहेत. वाचक, अभ्यासकांकडून त्याबाबत विचारणा, मागणी झाल्यास त्यांना ‘उपलब्ध नाही’ असे उत्तर येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारातून मिळत आहे. ग्रंथाची आवृत्ती १९९१ नंतर आजअखेर प्रकाशित करण्यात आलेली नाही.
या ग्रंथाची पहिली आवृत्ती १९६९ मध्ये प्रकाशित झाली. त्यावेळी धनंजय कीर आणि स. गं. मालशे यांनी संपादक म्हणून काम पाहिले. त्यानंतर संपादक य. दि. फडके यांनी काही नवीन मजकूर त्यात समाविष्ट करून १९९१ मध्ये सुधारित पाचवी आवृत्ती प्रकाशित केली. ८०६ पानांच्या या ग्रंथाची मांडणी हरी नरके यांनी केली असून, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने त्याचे प्रकाशन केले. त्यानंतर आजतागायत आवृत्तीचे प्रकाशन झालेले नाही.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अभ्यासक, वाचक, आदींकडून या ग्रंथाला मागणी आहे. त्यांनी कोल्हापुरातील शासकीय मुद्रणालयात या ग्रंथाची मागणी केली असता त्यांना तो उपलब्ध नाही, असे उत्तर दिले जात आहे. वाचक, अभ्यासक, आदींची मागणी लक्षात घेऊन या मुद्रणालयातील व्यवस्थापनाने संचालनालयाला तसेच राज्यातील अन्य मुद्रणालये आणि लेखनसामग्री भांडारांकडे या ग्रंथाची मागणी करणारी पत्रे दोन ते चारवेळा पाठविली आहेत. मात्र, त्यांच्याकडे त्याचा साठा शिल्लक नाही असे प्रत्युत्तर आले
आहे. दरम्यान, महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ, शोधाच्या नव्या वाटा, आम्ही पाहिलेले फुले हे ग्रंथदेखील ‘आउट आॅफ प्रिंट’ आहेत. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी आहे. त्यानिमित्त शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयाच्या ग्रंथालयाला काही ग्रंथांची आवश्यकता आहे. त्याबाबतचे पत्र संचालनालयाने १२ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील शासकीय ग्रंथ भांडाराला पाठविले आहे. यामध्ये ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’ या ग्रंथाचादेखील समावेश आहे.

सहा वर्षांत मिळाल्या ५०३ प्रती
कोल्हापुरातील शासकीय मुद्रणालयाला गेल्या सहा वर्षांत ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’ ग्रंथाच्या ५०३ प्रती मिळाल्या. यात २००७-०८ मध्ये २४१, २००८-०९ ला १६८, २०११-१२ मध्ये ७५, तर २०१२-१३ मध्ये १९ प्रतींचा समावेश आहे. २००९-११ व २०१३ पासून आजपर्यंतच्या प्रती उपलब्ध झालेल्या नाहीत.


यांच्याकडूनही छपाई नाही
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात झालेल्या व्याख्यानमालेतून काही पुस्तिकांची निर्मिती केली जाते. अशा पद्धतीने ‘महात्मा फुले यांनी उभारलेले बंडाचे निशाण : व्याख्यान पुष्प दुसरे’ आणि ‘महात्मा फुले यांचे राजकीय विचार’ या पुस्तिका तयार करण्यात आल्या. मात्र, मागणी असूनदेखील अद्यापही विद्यापीठाकडूनही या पुस्तिकांची छपाई झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.


या ग्रंथाचे पूर्वी राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून प्रकाशन होत होते. अलीकडेच ग्रंथाचे काम महात्मा फुले चरित्र, साधने प्रकाशन समितीने घेतले आहे. ग्रंथात लंडन तसेच अन्य काही ठिकाणांहून मिळविलेला नवीन मजकूर समाविष्ट केला आहे. त्याच्या मुद्रितशोधनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आम्हांला या ग्रंथाची सुधारित आवृत्ती २८ नोव्हेंबरला प्रकाशित करायची होती. मात्र, काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. पण, महिन्याभरात हा ग्रंथ बाजारपेठेत उपलब्ध होईल.
- हरी नरके, सदस्य सचिव, महात्मा फुले चरित्र, साधने प्रकाशन समिती

Web Title: Awaiting 'Mahatma Phule Composite Literature'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.