कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देण्यास टाळाटाळ
By Admin | Updated: January 21, 2015 23:51 IST2015-01-21T21:32:14+5:302015-01-21T23:51:32+5:30
राधानगरी तालुका : ३२७ ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत

कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देण्यास टाळाटाळ
भोगावती : राधानगरी तालुक्यातील काही ग्रामपंचायतीनी आपल्याच कर्मचाऱ्यांचे वाढीव पगार, भविष्य निर्वाह निधीचे लाखो रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टगेगिरी करणाऱ्या करवीर तालुक्यातील दोन पन्हाळा ग्रापंचायतीच्या कारभाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. टगेगिरी करणाऱ्यांनी यातून काही धडा घेतला नाही, तर फौजदारी गुन्ह्यास सामोरे जावे लागणार हे निश्चित.राधानगरी तालुक्यात ३२७ ग्रा. पं. कर्मचारी कार्यरत आहेत. ग्रा.पं.च्या कारभाऱ्यांपेक्षा कर्मचाऱ्यांच्या कामातून खऱ्या अर्थाने गावगाडा चालताना दिसून येतो, गावची स्वच्छता, घरफाळा वसुली, पाणी पुरवठा, दिवाबत्तीची सोय यांसह अनेक बाबी कर्मचाऱ्यांच्यावर कामावर अवलंबून राहतात. पंचायतीचा प्रगतीचा आलेख यावर ठरत असतो. गावकऱ्यांना चांगली सेवा देण्यात कर्मचाऱ्यांचा खरा वाटा राहिला असताना कारभारी मात्र त्यांच्याच डोक्यावरील लोणी खात आहेत. कर्मचाऱ्याचे हक्काचे पैसे अन्य बाबी म्हणून खर्च दाखवला जात आहे. मग घरफाळा, पाणीपट्टी, शासकीय मदत विविध योजनांच्या रूपाने आलेला पैसा कोठे गेला याचे ग्रा. पं.कडे उत्तर नाही.तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची खाती उघडण्यात आली आहे. मात्र, खात्यावर पैसाच भरलेला नाही. यासह वाढीव पगाराचे मिळून ७० लाखांच्या आसपास असणाऱ्या रकमेवर कर्मचाऱ्यांना पाणी सोडावे लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी शासनाच्या आदेशाच्या आधारे प्रत्येक ग्रामपंचायतीला लेखी कळवून देखील कारभाऱ्यांनी दाद दिलेली नाही.
अनेक ग्रा. पं.नी किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. शिवाय अनेक ग्रा. पं.नी वाढीव पगाराचे पैसे दिलेले नाहीत. यावरून राधानगरी तालुका ग्रा. पं. कर्मचारी संघ लढा उभा करत आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांवरील राजकीय हितसंबंधामुळे आंदोलनात अडथळा निर्माण होत आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष लाड यांनी केले आहे.
ग्रा. पं. कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतन आणि भविष्य निर्वाह निधीबाबत धांदल करणाऱ्या करवीर तालुक्यातील माळ्याची शिरोली, केकतवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील तांदूळवाडी या ग्रा. पं. पुढे झाल्या आहेत.
राधानगरी तालुक्यातील काही ग्रा. पं.मध्ये कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष सुभाष लाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.