गारगोटी : गारगोटी ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळावा या मागणीसाठी भुदरगड पंचायत समितीला टाळे ठोक आंदोलन करून लाक्षणिक उपोषण ग्रामपंचायत गारगोटीचे लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, कर्मचारी वर्ग यांच्यावतीने बुधवारी (दि १०) करण्यात आले. दोन दिवसांत ग्रामविकास अधिकारी देतो असे आश्वासन देणारे जि.प.च्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांचा जाहीर निषेध करण्यात आला. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचाय असलेल्या गारगोटी ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा, अशी मागणी गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने सर्वसामान्य लोकांची कामे, कामगारांचे पगार, विकासकामे यांना खीळ बसली आहे. याची दखल जि.प. अथवा पं.स.चे अधिकाऱ्यांनी न घेतल्याने यापूर्वी लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी दोन दिवसांत ग्रामविकास अधिकारी देतो, असे आश्वासन दिले होते. पण, त्यांनी कोणताही अधिकारी न दिल्याने आज पं.स.च्या कार्यालयाला टाळे ठोकले. सरपंच संदेश पांडुरंग भोपळे, उपसरपंच स्नेहल विजय कोटकर, पंचायतीच्या सदस्या गायत्री भोपळे, सदस्य सचिन देसाई, प्रकाश वास्कर, सुकेशनी सावंत, आशाताई भाट, जयवंत गोरे, रूपाली कुरळे, मेघा देसाई, राहुल कांबळे, कर्मचारी तानाजी सावळी, पांडुरंग गोरे, सुरेश देसाई, युवराज मुगडे, प्रकाश इंदुलकर, शैलेश सावंत, निर्मला कांबळे, शामराव शिंदे उपस्थित होते.
फोटो ओळ-
भुदरगड पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराला टाळेठोक आंदोलन करताना पंचायत समितीच्या सदस्या गायत्री भोपळे, सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच स्नेहल कोटकर, प्रकाश वास्कर.