अवि पानसरे व्याख्यानमाला ५ पासून
By Admin | Updated: November 27, 2014 00:13 IST2014-11-26T23:29:51+5:302014-11-27T00:13:39+5:30
श्रमिक प्रतिष्ठान : ‘भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर होणार विवेचन

अवि पानसरे व्याख्यानमाला ५ पासून
कोल्हापूर : नागरिकांची विचारांची बैठक अधिक पक्की करणाऱ्या आणि विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमालेला ५ डिसेंबरपासून सुरुवात होत असल्याची माहिती ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी दिली.
ते म्हणाले, श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या १२ वर्षांपासून ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. यंदा व्याख्यानमालेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर तज्ञ मंडळी विवेचन करणार आहेत. शाहू स्मारक भवनमध्ये १२ तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजता व्याख्याने होतील.
यंदाची निवडणूक व्यक्तिकेंद्रीत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्चस्व असणारी अशी होती. धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद, सामाजिक न्याय, संघराज्यात्मक रचना या घटनेच्या मुलतत्वांनाच आव्हान तयार झाले. एम.आय.एम सारख्या धर्मांधशक्ती पुढे येत आहे. भांडवली व्यवस्था, प्रसारमाध्यमे यांचा वापर आणि कोणताही मुद्दा नसलेली अशी ही निवडणूक होती. यात उत्तरेकडचे प्रादेशिक पक्ष व डावे पक्ष नगण्य बनले. या सर्व वास्तवांची व परिणामांची सखोल चर्चा या व्याख्यानमालेमध्ये होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. परिषदेला प्रा. विलास रणसुभे, चिंतामणी मगदूम, एस.बी.पाटील, दिलीप पवार, रमेश वडणगेकर, उमेश पानसरे उपस्थित होते.
व्याख्यानमालेचे विषय आणि वक्ते
५ डिसेंबर : लोकशाही व परिघाबाहेरील समाज : वक्ते : यशवंत मनोहर
६ डिसेंबर : पक्षपद्धती आणि लोकशाही : डॉ. यशवंत सुमंत
७ डिसेंबर : निवडणूक पद्धतीतील सुधारणा : अजित अभ्यंकर
८ डिसेंबर : निवडणुकीवर भांडवलाचा प्रभाव : डॉ. अरुणा पेंडसे
९ डिसेंबर : धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही : झहिर अली
१० डिसेंबर : प्रसारमाध्यमे आणि लोकशाही : जयदेव डोळे
११ डिसेंबर : लोकशाहीची वाटचाल : कुमार केतकर
१२ डिसेंबर : लोकशाही आणि समाजवाद : यू. एन. मिश्रा