‘एव्हीएच’चे २५ कोटींचे नुकसान; ५०० जणांवर गुन्हे
By Admin | Updated: March 9, 2015 01:10 IST2015-03-09T01:07:29+5:302015-03-09T01:10:12+5:30
जाळपोळ प्रकरण : संध्यादेवी कुपेकर, नंदिनी बाभूळकर यांचा समावेश

‘एव्हीएच’चे २५ कोटींचे नुकसान; ५०० जणांवर गुन्हे
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमधील एव्हीएच केमिकल्स प्रकल्पावर शनिवारी जमावाने चाल करून केलेल्या जाळपोळ आणि तोडफोडीत सुमारे २५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कंपनीचे १० टँकर, १० मोटारसायकली, जनरेटर, १० कार्यालये, १०० संगणक, फर्निचर, ५० वातानुकूलित संच, फर्नेस आॅईल, ५ सायकली, इलेक्ट्रिक साहित्य, संरक्षक भिंत, सुरक्षा कर्मचारी केबिन यांची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. याप्रकरणी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर, रामराजे कुपेकर, संजय नाईक, शिवाजी सावंत, सुभाष देसाई, रवी नाईक यांच्यासह ५०० आंदोलकांवर चंदगड पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे.
‘एव्हीएच’ हा प्रदूषणकारी, आरोग्य व निसर्गाला घातक असलेला प्रकल्प बंद करावा या मागणीसाठी गेली दोन-अडीच वर्षे आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाने शनिवारी हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक करून वाहने जाळून एव्हीएचच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून कंपनीत शिरून जाळपोळ केली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके व उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर या अधिकाऱ्यांनाही तब्बल सहा तास कोंडून ठेवले होते. जाळपोळीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पोलीस उपनिरीक्षक शरद माळी व सहकारी सायंकाळी उशिरापर्यंत करीत होते.
दरम्यान, एव्हीएच कंपनीची मोडतोड करून वाहने जाळून कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कंपनीचे सुरक्षा अधिकारी महादेव मनोहर काळे यांनी आमदार कुपेकर, डॉ. बाभूळकर, रामराजे कुपेकर, शिवाजी सावंत, संजय नाईक, सुभाष देसाई, रवी नाईक यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. तर कॉन्स्टेबल मारुती ठिकारे यांनी आंदोलकांनी दगडफेक करून स्वत:सह पोलीस निरीक्षक भालके, सहाय्यक निरीक्षक हंडे, पटेल यांना जखमी केल्याबद्दल आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
बंदी आदेशाचा भंग करून दगडफेक, जाळपोळ केल्याप्रकरणी या आंदोलकांवर कॉन्स्टेबल संग्राम पाटील यांनी गुन्हा नोंद केला आहे. (प्रतिनिधी)
स्थगिती आदेश कंपनीच्या भिंतीवर चिकटविला
४रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एव्हीएच प्रकल्प घटनास्थळाला पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तपासाबाबत काही सूचना केल्या.
४जाळपोळीची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राज्य सचिव डॉ. पी. एन. अनबलक यांनी एव्हीएच कंपनीच्या उत्पादनाला स्थगिती दिली आहे.
४या आदेशाच्या प्रती गावकामगार सुनील भंडारी यांनी कंपनीच्या भिंतीला चिकटविल्या, तर तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांच्या सुचनेनुसार प्रदूषण मंडळाने दिलेला स्थगिती आदेश कंपनीच्या भिंतीवर चिकटविण्यात आला.
‘एव्हीएच’ प्रकल्प निर्धोक
कंपनीचा खुलासा : प्रकल्प सर्व अटी व नियमांचे पालन करूनच सुरू
कोल्हापूर : ‘एव्हीएच’चा प्रकल्प निर्धोक आहे. कंपनीने राज्य सरकारच्या सर्व अटी आणि नियमांची पूर्तता करून तसेच पर्यावरणासंबंधित सर्व परवाने घेवूनच सुरु केला आहे. असा खुलासा कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
एव्हीएच प्रकल्पस्थळावर शनिवारी झालेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत या पत्रकात म्हटले आहे की, प्रकल्पाविषयी काही व्यक्तींकडून हेतूपुरस्सर पसरवण्यात आलेल्या अफवाचे स्पष्टीकरण करण्यास कंपनी तयार आहे. या व्यक्ती आपल्या व्यक्तिगत हितासाठी प्रकल्पाबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत.
हलकर्णी एमआयडीसीत एव्हीएच कंपनीचा जपानी तंत्रज्ञानावर आधारित दीड लाख टीपीए डांबर डेस्टीलेशनचा प्रकल्प आहे. राज्य पातळीवरील विभागाकडून पर्यावरणाशी संबंधित परवाने घेऊनच हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. निसर्गाच्या सुरक्षाविषयक मापदंडाची पूर्तता करण्यात आली आहे.
राज्य शासनाने नियुक्त केलेल्या संस्थांच्या १५ महिन्यांच्या चौकशीनंतर हलकर्णी येथील प्रकल्पाला परवानगी मिळाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटी आणि शर्तीनुसार दर सहा महिन्याला अहवाल सादर केला जातो. प्रकल्पात तयार होणारी उत्पादने ही अॅल्युमिनिअम आणि ग्राफाईट उद्योगात वापरली जातात. ज्याचा मानव आणि पर्यावरणावर कोणताही परिणाम झालेले
उदाहरण आजअखेर जगभरात कोठेही समोर आलेले नाही. काही लोक याला राजकीय रंग देत आहेत. या प्रकल्पात अडथळे आणत आहेत. अशा प्रकारामुळे गुंतवणुकदारांत भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते व यामुळे राज्यातील गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो, असेही या पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)