आवळे, मिणचेकर, महाडिकांची कसोटी
By Admin | Updated: February 16, 2017 01:05 IST2017-02-16T01:05:13+5:302017-02-16T01:05:13+5:30
शिरोलीचे रणांगण : कार्यकर्त्यांसोबत स्वत:देखील विजयासाठी प्रयत्नशील

आवळे, मिणचेकर, महाडिकांची कसोटी
सतीश पाटील --शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार डॉ. सुजित मिणचेकर, अमल महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार जयवंतराव आवळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पुढील विधानसभेच्या तयारीसाठी आतापासूनच पायाभरणी करण्याचा प्रयत्न आजी-माजी आमदारांकडून सुरू आहे.
या मतदारसंघात निकराची व चुरशीची तिरंगी लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्याकडे हातकणंगले आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाची जबाबदारी आहे. तर विधान परिषदेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी व काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कंबर कसली आहे.
शिरोली मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी ताराराणी आघाडीचे प्रमुख स्वरूप महाडिक यांच्यावर आहे. उमेदवार स्वत:च्या घरातील असल्यामुळे महाडिकांनी कार्यकर्त्यांना रात्रीचा दिवस करायला सांगितले आहे. महाडिक गटाचे दिलीप पाटील, सुरेश पाटील, संदीप तानवडे, सचिन गायकवाड हे विजयासाठी संपूर्ण मतदारसंघात योग्य प्रकारे व्युहरचना आखत आहेत.
अमल महाडिक यांनी विकासकामांच्या मुद्द्यावर पत्नी शौमिका महाडिक यांना पक्षाची उमेदवारी मिळविली आहे. या ठिकाणी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते सतीश पाटील हे पत्नी अलका पाटील यांना उमेदवारी मागत होते; पण भाजपने पुन्हा एकदा विद्यमान सदस्या शौमिका महाडिक यांना उमेदवारी दिली. प्रचार प्रारंभासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांना आणून नाराज झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सभेला बोलाविले. तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी या मतदारसंघात जातीने लक्ष घालून विविध जोडण्या सुरू केल्या आहेत. कार्यकर्त्यासोबत बैठक आयोजित करून स्नुषा शौमिका महाडिक यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. महाडिक पिता-पुत्र ही निवडणूक जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
काँग्रेसचे माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई झाली आहे. यामुळेच यांनी शिरोलीतून तितक्याच ताकदीच्या हातकणंगले पंचायत समितीच्या माजी उपसभापती सुचित्रा शशिकांत खवरे यांना जिल्ह्यातील पहिली उमेदवारी जाहीर केली. शशिकांत खवरे यांना मानणारा काँग्रेसचा मोठा गट आहे. त्यांनी काही महिन्यापासून निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. विविध प्रश्नावर आंदोलन करून सामान्यामध्ये आपली उमेदवारीची चर्चा सुरू केली होती. जोतिराम पोर्लेकर, सरदार मुल्ला, उत्तम पाटील, मुन्ना सनदे हे काँग्रेसचा संपर्क वाढवित आहेत.
वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील यांनी नागाव, संभापूर, तासगाव, मौजे वडगाव येथे रूपाली खवरे यांच्यासाठी गाठीभेटी व मोठा संपर्क वाढविला आहे. अनिल खवरे, महेश चव्हाण, बाजीराव पाटील, सुरेश यादव हे शिवसैनिकांची जुळवाजुळव करून मोर्चेबांधणी करीत आहेत. तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी याठिकाणी केंद्रीत आहेत.
काँग्रेसच्या उमेदवार सुचित्रा खवरे यांच्या प्रचाराचा प्रारंभ ही आवळे यांच्या हस्तेच झाला. आवळे यांनी भाजपवर तोफ डागत भाजपच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. विस्कळीत झालेले कार्यकर्ते एकत्र करण्याचा प्रयत्न जयवंतराव आवळेंकडून सुरू आहे.
आमदार मिणचेकर यांना दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीत शिरोलीच्या शिवसेनेचे मोठे मताधिक्य मिळाले होते. मिणचेकर यांनी अंतर्गत बैठका घेऊन रूपाली खवरे यांना विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे.
शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी शिवसेना आणि जनसुराज्य यांची स्थानिक शाहू आघाडीच्या माध्यमातून मोट बांधली आहे. शाहू आघाडीने माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे यांच्या पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या रूपाली खवरे यांना उमेदवारी दिली आहे. आमदार मिणचेकर यांनी शाहू आघाडीच्या प्रचारात भाग घेत उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.