प्राधिकरणाने गावाेगावी बैठका घ्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:25 IST2021-09-26T04:25:28+5:302021-09-26T04:25:28+5:30
कोल्हापूर : प्राधिकरणाची कामाची पध्दत वेगळी आहे. त्याच्याशी गावोगावच्या संबंधितांना जुळवून घेताना अडचणी ...

प्राधिकरणाने गावाेगावी बैठका घ्याव्यात
कोल्हापूर : प्राधिकरणाची कामाची पध्दत वेगळी आहे. त्याच्याशी गावोगावच्या संबंधितांना जुळवून घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे याबाबत प्राधिकरणाने गावोगावी बैठका घ्याव्यात आणि त्यानंतरच आराखडा निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या गावच्या सरपंच, ग्रामसेवकांची बैठक घेण्यात आली. यावेळी ही मागणी करण्यात आली. या सर्वांना प्राधिकरणाच्या कामाची माहिती आणि त्यांच्या सूचना ऐकून यापुढची कामाची दिशा ठरवण्याबाबत ही बैठक घेण्यात आली होती.
कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. चव्हाण यांनी आराखड्याबाबतची सविस्तर माहिती दिली. ग्रामपंचायतीच्या हद्दीत बांधकाम करताना त्याआधी ग्रामपंचायतीचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र सक्तीचे करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच आराखडा निश्चित करण्यापूर्वी गावोगावी बैठका घ्याव्यात. ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि काही निवडक ग्रामस्थांनाही या बैठकीला पाचारण करावे. सर्वांची मते ऐकल्यानंतर मगच आराखडा निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत सरपंच सचिन चौगुले, प्रकाश रोटे, संग्राम पाटील, प्रकाश जिरंगे, सागर भोगम, अरुण माळी यांनी भाग घेतला. पुढील आठवड्यात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा बैठक घेण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी स्वागत केले. हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी आभार मानले.