प्राधिकरण ‘निवडणूक निधी’ला होणार विरोध

By Admin | Updated: December 17, 2014 23:59 IST2014-12-17T23:20:10+5:302014-12-17T23:59:10+5:30

सहकारी संस्था एकवटल्या : गडहिंग्लजला आज बैठक

Authority to oppose 'election fund' | प्राधिकरण ‘निवडणूक निधी’ला होणार विरोध

प्राधिकरण ‘निवडणूक निधी’ला होणार विरोध

राम मगदूम - गडहिंग्लज -सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निधी व भत्त्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जारी केलेल्या अन्यायी परिपत्रकाच्या विरोधात गडहिंग्लज उपविभागातील संस्था एकवटल्या आहेत. खर्चिक निवडणुका ग्रामीण संस्थांना न परवडणाऱ्या असल्याची त्यांची भावना असून, प्राधिकरणाच्या फतव्याविरुद्ध संघर्षाची चिन्हे आहेत. यासंदर्भात उद्या, गुरुवारी गडहिंग्लजमध्ये होणाऱ्या संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुका खात्याच्या परवानगीनेच परंतु संस्था पातळीवर घेतल्या जात. मात्र, संस्थांच्या कामकाजात व त्यांच्या निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या सहकारी कायद्यातील घटना दुरुस्तीनंतर निवडणूक प्राधिकरण स्थापण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ मधील चारमध्ये सहकारी संस्थांचे अ,ब,क आणि ड असे प्रकार करण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्यात ‘क’ वर्गातील संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात प्राधिकरणाने जारी केलेल्या परिपत्रकात निवडणूक निधी व भत्त्यासंदर्भात निर्देश आहेत.
नव्या नियमानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा भत्ता, अन्य खर्च व सभासद संस्थेवर निर्धारित निवडणूक निधी लहान व अडचणीतील संस्थांना परवडणारे नाही. प्राधिकरणाच्या अन्यायी निवडणूक खर्चामुळे संस्था आणखी अडचणीत येतील, असा संस्था चालकांचा आक्षेप आहे.


यापूर्वी संस्था पातळीवर घेतल्या जाणाऱ्या निवडणुका कमी खर्चात होत. निवडणूक निधी व खर्च छोट्या संस्थांना परवडणारा नाही. जनतेच्या करातून पगार घेणाऱ्या सहकारी अधिकाऱ्यांनी विना मोबदला निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहावे. काटकसरीसाठी पूर्वीप्रमाणेच निवडणूक खर्चासंबंधीच्या निर्णयाची मुभा संस्थेला असावी.
- अरुण देसाई, अध्यक्ष बसवेश्वर पतसंस्था, तेरणी.
प्राधिकरणाच्या निवडणूक नियंत्रणास संस्थांचा विरोध नाही; परंतु अन्यायी निवडणूक निधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामुळे संस्था मोडकळीस येण्याची शक्यता असल्यानेच त्यास विरोध आहे. यासंदर्भात सहकारमंत्र्यांकडे व गरज भासल्यास न्यायालयाकडे दाद मागितली जाईल.
- सईदअहमद खलिफा,
अध्यक्ष, गडहिंग्लज तालुका पतसंस्था फेडरेशन.

Web Title: Authority to oppose 'election fund'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.