गुंडवरला एकचक्री डावावर दाखवले आस्मान
By Admin | Updated: August 5, 2014 00:05 IST2014-08-04T22:56:41+5:302014-08-05T00:05:12+5:30
निकाली कुस्ती : मारुती जाधव ठरला लाखाचा मानकरी

गुंडवरला एकचक्री डावावर दाखवले आस्मान
म्हसवड : श्रीयाळषष्टीनिमित्त येथील रिंगावण पेठ मैदानात झालेल्या निकाली कुस्त्यांच्या आखाड्यात कोल्हापूरचा पहिलवान मारुती जाधव याने सांगलीच्या सुधाकर गुंडवर याला एकचक्री डावावर आस्मान दाखवत लाखाची प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानाचे या कुस्तीने डोळ्यांचे पारणे फेडले.
म्हसवडचे माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने यांच्या नेतृत्वाखाली निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती म्हसवडचा पहिलवान तानाजी वीरकर आणि वारणा येथील पहिलवान सचिन पाटील यांच्यात झाली. त्यामध्ये वीरकर याने पाटील यास कलाजंग या डावावर चितपट करीत ५० हजारांची कुस्ती जिंकली तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती म्हसवड येथील पहिलवान नाना खांडेकर विरुद्ध कोल्हापूर येथील हणमंत कचुरडे यांच्यात झाली. त्यात खांडेकर याने घुटना डावावर विजय मिळवत २५ हजारांचे बक्षीस जिंकले.प्रारंभी मैदानात विविध भागांतून आलेल्या मल्लांना खेळाची संधी देण्यात आली. त्यात हणमंत जाधव, नवनाथ खांडेकर, विशाल जाधव, तुषार माने, सतीश खरात, महावीर वीरकर, अविनाश चव्हाण, वैभव बनगर, नवनाथ शेंडगे या पहिलवानांनी नेत्रदीपक कुस्त्या करीत प्रेक्षकवर्गाची मने जिंकली. या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, शिवाजी दीडवाघ यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती.
विजेत्या मल्लांना माजी आमदार सदाशिव पोळ, नगराध्यक्ष विजय सिन्हा, सभापती श्रीराम पाटील, हरणाई सूतगिरणीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, वाघोजी पोळ यांच्या हस्ते रोख रकमेची बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. यावेळी तेजसिंह राजेमाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
माण नदीपात्रात श्रीयाळषष्टीनिमित्त वर्षानुवर्षे कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात येते. ही अनेक वर्षांची परंपरा महसूल खात्याच्या कृपाशीर्वादामुळे माण नदीपात्रात वाळूच शिल्लक न राहिल्याने दगड-धोंड्यांचे पात्र बनले असल्याने संयोजक कमिटीला पहिल्यांदाच माण नदीपात्राबाहेर कुस्ती मैदानाचे आयोजन करावे लागले. त्यामुळे महसूल खात्याच्या दुर्लक्षामुळे परंपरा खंडित करणे भाग पडले.