आंब्यापेक्षा ‘हनुमान’चे आकर्षण

By Admin | Updated: December 15, 2014 00:14 IST2014-12-15T00:04:41+5:302014-12-15T00:14:21+5:30

आठवडी बाजार : कडधान्य स्थिर; भाजीपाला, कोथिंबीर घसरली; ‘हापूस’, ‘तोतापुरी’कडे दुर्लक्ष

Attraction of 'Hanuman' than Mango | आंब्यापेक्षा ‘हनुमान’चे आकर्षण

आंब्यापेक्षा ‘हनुमान’चे आकर्षण

कोल्हापूर : कोल्हापूर फळ मार्केटमध्ये या आठवड्यात हापूस व तोतापुरी आंब्यांची आवक सुरू झाली आहे. बंगलोर येथून दररोज वीस बॉक्स आवक सुरू असली तरी या आंब्याला फारशी मागणी नसल्याने दर जेमतेमच आहेत. सोलापूर जिल्ह्यातून आलेले हनुमान फळ सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाला घसरला असून, घाऊक बाजारात मेथीची पेंडी तीन रुपये, तर कोंथिबीर दोन रुपयांपर्यंत खाली आली आहे. कडधान्याचे दर स्थिर असले तरी शाबूदाणा व सरकी तेलाच्या दरातील घसरण अद्याप थांबलेली नाही.
साधारणत: रत्नागरी, देवगड हापूसची आवक फेबु्रवारी महिन्यात सुरू होते. पण, यंदा बंगलोरमधून हापूस आंब्यांची आवक कोल्हापूर मार्केटमध्ये सुरू झाली आहे. रोज सरासरी वीस बॉक्स आंब्यांची आवक होत असली तरी रत्नागिरीची चव नसल्याने हा आंबा ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला नाही. तीच अवस्था तोतापुरी आंब्यांची आहे. साधारणत: पाचशे किलो तोतापुरीची आवक सुरू असून, ७५ रुपये किलोने त्याची विक्री सुरू आहे. सीताफळ, रामफळाची आवक गेले अनेक दिवस सुरू आहे. दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी हनुमान फळाची आवक झाली आहे. सांगोला, पंढरपूर येथून आवक होणाऱ्या या फळाचे वजन ७० ते ८० ग्रॅम असते, पिकल्यानंतर ते अधिक गोड लागत असल्याने त्याला मागणी मोठी आहे.
साधारणत: १५० ते २०० रुपये डझनाचा दर आहे. संत्र्यांसह माल्टाची आवक मोठ्या प्रमाणात आहे. किरकोळ बाजारात संत्री वीस रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. बोरांची आवकही वाढू लागली असून, द्राक्षांची आवक सुरू असली तरी फारच कमी आहे.
गेले आठवड्याच्या तुलनेत कोबी, वांगी, टोमॅटो, ढब्बू, भेंडी, वरणाचे दर एकदम खाली आले आहेत. इतर भाज्यांचे दर स्थिर राहिले असून, कोथिंबीर, मेथीची आवक वाढल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. सरकी तेलाच्या दरात दोन रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात साखरेच्या दरात
चढ-उतार असला तरी किरकोळ बाजारात २८ ते ३० रुपये किलोने विक्री सुरू आहे.

भाज्यांचे दर (प्रतिकिलो)
कोबी : ३ ते ११
वांगी : ३ ते २२
टोमॅटो : ३ ते १६
ढब्बू : १५ ते ३५
गवार : २० ते ४०
वाटाणा : १७ ते ३५
कारली : १३ ते २५
दोडका : ७ ते ४०.


‘रत्नागिरी हापूस’ जानेवारीत येणार
सध्या बंगलोर हापूसची आवक सुरू असली तरी रत्नागिरी व देवगडच ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. या आंब्याची वाट ग्राहक सात-आठ महिने बघत असतो. यंदा खराब हवामान असले तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हापूस बाजारात दाखल होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.



गूळ घसरला,
कांदा स्थिरावला
गेले आठवड्याच्या तुलनेत गुळाच्या दराची प्रतिक्विंटल १०० ते १५०० रुपयांनी खाली आले आहेत. प्रतिक्विंटल २८०० ते ३१९० रुपये दर झाला असून, एक किलो गुळाचा दर २५०० रुपयांपर्यंत घसरला आहे. कांदा व बटाट्याचे दर तुलनात्मक स्थिर राहिले आहेत.

लक्ष्मीपुरी येथील आठवडी बाजारात ‘हनुमान’ फळ ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. पंढरपूर भागातून या फळाची आवक झाली .

Web Title: Attraction of 'Hanuman' than Mango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.