हागणदारीमुक्तीसाठी वस्त्रनगरींवर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 00:25 IST2017-01-21T00:25:58+5:302017-01-21T00:25:58+5:30
इचलकरंजी शहराचा आढावा : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे प्रकल्प संचालक टेकाळे यांची माहिती

हागणदारीमुक्तीसाठी वस्त्रनगरींवर लक्ष
इचलकरंजी : राज्यातील ९० शहरे हागणदारीमुक्त झाली असून, त्यापाठोपाठ इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव या वस्त्रोद्योगांशी निगडित असलेली औद्योगिक शहरेदेखील हागणदारीमुक्त व्हावीत याकडे शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. यापैकी इचलकरंजी नगरपालिकेने अन्य शहरांच्या तुलनेत हागणदारीमुक्तीसाठी चांगले काम केले असून, आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक शहर हागणदारीमुक्त झाले आहे, अशी माहिती स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ. उदय टेकाळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शुक्रवारी ते इचलकरंजी येथे आले होते. त्यांनी नगरपरिषदेकडील आरोग्य व स्वच्छता विभागाकडे सुरू असलेल्या हागणदारीमुक्त शहराचा आढावा घेतला.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यामध्ये नऊ लाख शौचालये बांधण्याचे शासनाचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत सात लाख
शौचालये उभारण्यात आली
असून, उर्वरित दोन लाख
शौचालये वर्षभरात बांधण्यात येणार आहेत.
इचलकरंजी शहरातील हागणदारीमुक्तीचे काम अन्य औद्योगिक शहरापेक्षा अधिक प्रगतिपथावर असल्याचे सांगून ते म्हणाले, इचलकरंजीमध्ये २३८८ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १२४५ शौचालये बांधण्यात आली आहेत.
त्याचबरोबर या नगरपालिकेने उभारलेल्या पे अॅण्ड युज पद्धतीच्या सार्वजनिक शौचालयांचा नागरिक चांगल्या पद्धतीने वापर करीत आहेत, ही समाधानकारक बाब आहे. १५ फेब्रुवारीला राज्यातील ग्रामीण भागाबरोबर सर्वच शहरांचा हागणदारीमुक्तीच्या दृष्टीने आढावा घेण्यात येईल. त्यावेळी इचलकरंजी हागणदारीमुक्त झालेली असेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
पालिकांसाठी विशेष अनुदान
पूर्णपणे हागणदारीमुक्त होणाऱ्या शहरांना शासनाकडून विकासासाठी संबंधित नगरपालिकांना दोन कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे, असे सांगून डॉ. टेकाळे म्हणाले, हागणदारीमुक्त झालेल्या शहरातील नगरपालिकांसाठी शासन स्तरावर मिळणाऱ्या विविध योजनेंतर्गत अनुदान देण्यासाठी अधिक लक्ष देण्यात येईल; म्हणून नगरपालिकांनी आपली शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी केले.