चौदा हजार सभासदांच्या सुनावणीकडे लक्ष
By Admin | Updated: April 9, 2016 00:08 IST2016-04-08T23:47:14+5:302016-04-09T00:08:20+5:30
बिद्री कारखाना निवडणूक : १२ रोजी सुनावणी, इच्छुकांचा भेटी-गाठींवर जोर

चौदा हजार सभासदांच्या सुनावणीकडे लक्ष
सोळांकूर : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मिळेल त्या कार्यक्रमात नेतेमंडळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडून तोंडसुख घेत आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला असला, तरी १२ एप्रिलला होणाऱ्या १४ हजार सभासदांच्या न्यायालयीन सुनावणीकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ही अंतिम सुनावणी असण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी नेतेमंडळींचे उंबरे, तसेच मतदार, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर जोर दिला आहे.
राधानगरी, भुदरगड, कागल आणि करवीर अशा चार तालुक्यांतील २१८ गावांचे कार्यक्षेत्र आहे. ६९,४८० इतके ‘अ’ व ‘ब’ वर्ग सभासद आहेत. सर्वसाधारण १४ हजार सभासदांचे अस्तित्व न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहे. याबाबतची सुनावणी १२ एप्रिलला आहे. ही सुनावणी अंतिम असण्याची शक्यता आहे.
या सुनावणीचा निकाल काही होवो, आपली उमेदवारी पक्की व्हावी, या निवडणुकीला सामोरे जायचे आहे हे लक्ष्य ठेवून कामाला लागले आहेत.
सत्तारूढ गट कारखान्याचा कारभार पारदर्शक आहे, उच्चांकी ऊसदर, सक्षम चाललेला सहवीज प्रकल्प, व्यवस्थित ऊसतोडणी कार्यक्रम, आदी गोष्टींचा प्रचार करत आहेत, तर विरोधी आघाडी सहवीज प्रकल्पातील तोटा, ढिसाळ ऊसतोडणी कार्यक्रम, अनावश्यक खर्च, पाच वर्षांत संचालक मंडळाने भ्रष्ट कारभार केल्याचा आरोप करत आहे. यामुळे कारखाना निवडणुकीच्या चर्चेला चांगलीच रंगत आली आहे.
बिद्रीच्या निवडणुकीत आघाड्या कशा होणार, पॅनेल किती होणार, कोण कोणाबरोबर राहणार, यांची खलबते होणार आहेत.
सत्तारूढ गटाकडून आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील हे ‘बिद्री’त सत्ता आमचीच असणार आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करीत आहेत. समविचारी आघाडी, गट यांना सोबत घेऊ, कार्यकर्त्याला न्याय देऊ, असे ठणकावून सांगत आहेत.
याशिवाय दिनकरराव जाधव, संजयबाबा घाटगे, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, बाबासाहेब पाटील, विजयसिंह मोरे, नंदकिशोर सूर्यवंशी, राजेखान जमादार, मारुतीराव जाधव, के. जी. नांदेकर, सत्यजित पाटील, डी. एस. पाटील, आदी विरोधी मंडळी ‘बिद्री’ बचावचा नारा देत आहेत. यामध्ये ‘राजे’ गट, आमदार सतेज पाटील गट यांची मते निर्णायक ठरणार आहेत.
सत्तारूढ संचालक विरोधकांच्या भूमिकेत
सत्तारूढ गटातील, पण सध्या विरोधी भूमिकेत असणाऱ्यांमध्ये संचालक विजयसिंह मोरे (सरवडे), डी. एस. पाटील (मांगोली), राजेखान जमादार (मुरगूड), के. जी. नांदेकर (तिरवडे) यांचा समावेश आहे. सत्तारूढ गटातील काही संचालक आपल्याबरोबर राहतील, असा दावा विरोधी गट करत आहे.