घरफाळा थकबाकी वसुलीचे प्रयत्न असफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:39 IST2021-05-05T04:39:15+5:302021-05-05T04:39:15+5:30

भारत चव्हाण / कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागाच्या थकबाकीचे आकडे वाढले असताना त्याच्या वसुलीकरिता या विभागानेच फारसे गांभीर्याने पाहिलेले ...

Attempts to recover arrears failed | घरफाळा थकबाकी वसुलीचे प्रयत्न असफल

घरफाळा थकबाकी वसुलीचे प्रयत्न असफल

भारत चव्हाण / कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागाच्या थकबाकीचे आकडे वाढले असताना त्याच्या वसुलीकरिता या विभागानेच फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. थकबाकी असलेल्या १२०० मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या. परंतु, त्यातील दोन-तीन मिळकतींवर बोजा चढवून बाकीच्या कारवाया करण्याचे प्रशासनाने धाडस केले नाही. त्यामुळे थकबाकी वसुलीवर परिणाम झाला. या विभागाची अकार्यक्षमता स्पष्ट झाली.

घरफाळा विभागाची प्रत्येक वर्षाची अपेक्षित जमा किती असेल तसेच वसुली किती झाली, हे अंदाजपत्रकात सांगितले जाते. परंतु, प्रत्येक वर्षी राहणाऱ्या थकबाकीचे आकडे कधीच जाहीर केले नाहीत. सहायक आयुक्त विनायक औधकर यांच्याकडे घरफाळा विभागाचा कार्यभार आला तेव्हा त्यांनी चालू वर्षाची मागणी, वसुली आणि गेल्या अनेक वर्षांची असलेली थकबाकी याचे नेमके आकडे समोर आणले. घरफाळ्याची गेल्या अनेक वर्षांची २५३ कोटींची थकबाकी असल्याचे त्यांनी प्रथमच सांगितले.

चालू मागणीबरोबरच थकबाकी वसुलीचे मोठे आव्हानात्मक काम होते. त्यामुळे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सवलत योजना जाहीर केली. तेव्हा नागरिकांनी पुढे येऊन थकबाकी भरण्यास प्राधान्य दिले. तरीही हे प्रमाण कमीच होते. वर्षानुवर्षे घरफाळा थकविणाऱ्यांनी सवलत योजनेकडेही पाठ फिरविली. त्यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करणे अपेक्षित होते. १२०० मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या, पण त्यातील दोन-तीन मिळकतींवर बोजा चढविला, बाकीच्या मिळकतधारकांवर काहीच कारवाई झाली नाही.

स्थानिकांचा असहकार?

घरफाळा विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुलीवर जोर द्यायला पाहिजे होता; पण सर्वच कर्मचारी, अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी सहकार्य केले नाही. त्यांच्या नोटिसांना उत्तरे दिली नाहीत, त्यांनी मागितलेली माहिती देण्याचे टाळले. त्यातून स्थानिक कर्मचारी, अधिकारी एकीकडे आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी यांच्यात उभी फूट पडली. स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी असहकारच पुकारला असल्याची परिस्थती घरफाळा विभागात आहे.

-दि. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत जमा तपशील-

- भरणा केलेल्या मिळकती - ९८,०६८

मागील थकबाकी १२२ कोटी पैकी वसूल १७,३८,०४,७६९

चालू मागणी - ५४ कोटींपैकी वसूल ३५,०६,९७,७०७

दंड व्याज - ८४ कोटींपैकी वसूल ९,३३,२०,३६५

एकूण जमा - ६१,७८,२२,८४१

Web Title: Attempts to recover arrears failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.