पक्षकार-वकिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By Admin | Updated: August 17, 2015 00:47 IST2015-08-17T00:45:49+5:302015-08-17T00:47:33+5:30
सर्किट बेंच : आठजणांना अटक, सुटका; गनिमी काव्याने खळबळ

पक्षकार-वकिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने शनिवारी, स्वातंत्र्यदिनी उग्र रूप धारण केले. पक्षकार संघटनेचे कार्यकर्ते प्रसाद जाधव, उदय लाड यांच्यासह आठजणांनी जिल्हा व सत्र न्यायालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांची धरपकड केल्याने पुढील अनर्थ टळला. गनिमी कावा पद्धतीने केलेल्या या आंदोलनाने खळबळ उडून तणाव निर्माण झाला. आत्मदहन करणाऱ्या आंदोलकांना अटक करून वैद्यकीय तपासणीनंतर वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आले. घोषणाबाजी करीत आंदोलन करणाऱ्या ३६ वकिलांनाही ताब्यात घेत काही वेळानंतर सुटका करण्यात आली.कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी पक्षकार संघटनेचे कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी जिल्हा न्यायालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांसह गुप्तचर यंत्रणेने न्यायालय परिसराची श्वानपथकाद्वारे पाहणी केली होती. त्यावेळी येथील कचराकुंडीत एक पाच लिटरचा रॉकेलचा कॅन हस्तगत करण्यात आला. त्यामुळे शनिवारी सकाळी सहापासून जिल्हा न्यायालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाऊसिंगजी रोड मार्ग बॅरेकेट्स लावून चारचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. एक पोलीस उपअधीक्षक, सहा पोलीस निरीक्षकांसह १२०हून अधिक वर्दीतील पोलीस व ८०हून अधिक साध्या वेषातील पोलीस ठिकठिकाणी तैनात असल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशमन दल बंबासह रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली होेती. सकाळी ७.३० वाजता जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एल. अवचट यांच्या हस्ते न्यायालयासमोर ध्वजारोहण होणार होते. तत्पूर्वी ध्वजारोहण कार्यक्रमास येणाऱ्या व्यक्तीची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत होती. ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थित असणाऱ्या वकिलांनी ‘सर्किट बेंचप्रश्नी दिरंगाई करणाऱ्या यंत्रणेचा धिक्कार असो’, अशा जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी आपला मोर्चा तिकडे वळविला. घोषणाबाजी करत वकील न्यायालयाबाहेर येत असतानाच फाटकावरच अचानक पक्षकार संघटनेचे कार्यकर्ते उदय लाड त्यामध्ये सहभागी झाले. त्यांनी आपल्या जवळील बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडील रॉकेलची बाटली हस्तगत करत पोलीस व्हॅनकडे नेत असतानाच चिमासाहेब चौकाकडून आलेल्या प्रसाद जाधव यांनीही घोषणाबाजी करत अंगावर रॉकेल ओतून घेतले. पाठोपाठ मनीषा नाईक, सलीम पाच्छापुरे यांनीही रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. पक्षकारांनी अचानक गनिमी कावा पद्धतीने केलेल्या या आंदोलनाने पोलीस पुरते गोंधळून गेले, परंतु प्रसंगावधान राखून त्यांनी आंदोलकांकडील रॉकेलच्या बाटल्या हस्तगत केल्याने पुढील अनर्थ टळला. या सर्वांसह आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या कोल्हापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांच्यासह इतर वकिलांनाही पोलीस व्हॅनमध्ये घालून लक्ष्मीपुरी ठाण्यात आणले. त्यानंतर वकिलांनी न्यायालयासमोर घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. त्यांनाही पोलिसांनी टप्प्या-टप्प्याने ताब्यात घेऊन अलंकार हॉल येथे नेले. तोपर्यंत काही वेळांतच वकिलांच्या गर्दीत असणाऱ्या अॅड. कुलदीप कोरगांवकर यांनीही रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. जागेवर पोलीस व्हॅन नसल्याने त्यांना ताब्यात घेत पोलिसांनी अक्षरश: पळवत नेत चिमासाहेब चौकात उभ्या असलेल्या सुमोत कोंबले. त्यामुळे न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. (प्रतिनिधी)
आता मुंबईतही उद्रेक
गेली तीन वर्षे सर्किट बेंचच्या मागणीसाठी लढा सुरू आहे. राज्य शासनानेही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांना याविषयी कळविले आहे; तरीही याबाबत निर्णय घेण्यासाठी जाणून-बुजून दिरंगाई केली जात आहे. त्याचा उद्रेक कोल्हापुरात झाला आहे. येणाऱ्या काळात दिरंगाई करणाऱ्या यंत्रणेच्या दारात वकील व पक्षकार आत्मदहन करतील व मुंबईतही याचा उद्रेक होईल.
- अॅड. विवेक घाटगे, माजी अध्यक्ष, कोल्हापूर बार असोसिएशन
आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे
प्रसाद धनाजीराव जाधव (वय ४५, रा. शाहू बँक चौक, मंगळवार पेठ), उदय आनंदराव लाड (३९, रा. टिंबर मार्केट कमानीजळ, लाड चौक), सलीम मौलासो पाच्छापुरे (४१, रा. प्रगती नगर, पाचगाव रोड), मनीषा बाजीराव नाईक (३१, रा. टिंबर मार्केट परिसर), अॅड. विवेक नाईकराव घाटगे (४५, सी वॉर्ड, शनिवार पेठ), अॅड. कुलदीप सुहास कोरगावकर (३०, रा. सी. वॉर्ड, शनिवार पेठ), अॅड. समीउल्ला महंमदइसाक पाटील (३०, सी वॉर्ड, शनिवार पेठ), अॅड. पांडुरंग बाबूराव दळवी (३४, डी वॉर्ड, तेली गल्ली, शुक्रवार पेठ) अशी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी रॉकेल कॅन, रॉकेलमध्ये भिजलेले कपडे जप्त केले.
ताब्यात घेऊन सुटका केलेल्या वकिलांची नावे
अॅड. प्रशांत चिटणीस (अध्यक्ष, कोल्हापूर बार असोसिएशन), अॅड. रवींद्र जानकर (सेके्रटरी, कोल्हापूर बार असोसिएशन), अॅड. शिवाजीराव राणे (माजी अध्यक्ष, कोल्हापूर बार असोसिएशन), अॅड. राजेंद्र मंडलिक, अॅड. राजेंद्र किंकर, अॅड. राजेंद्र पाटील, अॅड. सुनील रणदिवे, अॅड. बाबासाहेब वागरे, अॅड. उदयराज बडस्कर, अॅड. अजितकुमार गोडे, अॅड. संतोष तावदारे, अॅड. बाळासाहेब पाटील, अॅड. अजित मोहिते, अॅड. व्ही. आर. पाटील, अॅड. के. व्ही. पाटील, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. किशोर नाझरे, अॅड. सुशांत गुडाळकर, अॅड. नंदकिशोर पाटील, अॅड. मिलिंद शेडशाळे, अॅड. प्रकाश पाटील-सरुडकर, अॅड. संदीप चौगुले, अॅड. अशोक पाटील, अॅड. रमेश कांबळे-बोरगावकर, अॅड. सुभाष मगदूम, अॅड. डी. डी. देसाई, अॅड. योगेश साळोखे, अॅड. विक्रम बन्ने, अॅड. अंशुमन कोरे, अॅड. निशिकांत पाटोळे, अॅड. राजेंद्र पाटील, अॅड. निखिल शिराळकर, अॅड. शिवप्रसाद सांगवडेकर, अॅड. अनिरुद्ध कुलकर्णी, अॅड. दीपक पिंपळे, अॅड. गुरुप्रसाद पाटील.
पोलिसांचाही गनिमी कावा
पक्षकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने पोलिसांनी न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांना शोधण्यासाठी पोलिसांनी वकिलांसह, न्यायालयीन कर्मचारी व बेलीफ अशी वेशभूषा केली होती. आंदोलकांची धरपकड करताना हा पोलिसांचाही गनिमी कावा दिसला.