कोल्हापुरात शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न

By Admin | Updated: March 6, 2015 01:19 IST2015-03-06T01:11:41+5:302015-03-06T01:19:48+5:30

बुधवार पेठेतील घटना : प्रसंगावधान राखून मुलाने अपहरणकर्त्यांना नखाने ओरबाडून करून घेतली सुटका; पालकवर्गात भीतीचे वातावरण

Attempts to kidnap a schoolboy in Kolhapur | कोल्हापुरात शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न

कोल्हापुरात शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न

 कोल्हापूर : शाळेतून घरी जाणाऱ्या अनुज सुभाष मोहिते (वय १०, रा. ढिसाळ गल्ली, जुना बुधवार पेठ) या दहा वर्षांच्या शाळकरी मुलाचे मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. अनुजने धाडसाने अपहरणकर्त्यांच्या हाताचा नखांनी ओरखडा घेत आपली सुटका करून घेतली. संशयित तरुण ‘धूम स्टाईल’ने टाऊन हॉलच्या दिशेने पसार झाले. शहरातील जुना बुधवार पेठ तालमीसमोर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. अनुजने या प्रकाराची माहिती घरी जावून आईला सांगितली. त्यांनी शेजारील लोकांना या प्रकाराची माहिती दिल्याने गल्लीतील तरुण व महिलांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर काही तरुणांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन अनुजकडून अपरहणकर्त्यांची माहिती घेतली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अनुज मोहिते याचे आई-वडील शिक्षक आहेत. त्याला आणखी एक लहान भाऊ आहे. तो तोरस्कर चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिकतो. गुरुवारी सकाळची शाळा सुटल्यानंतर साडेदहाच्या सुमारास तो घरी चालत येत होता. जुना बुधवार तालमीसमोर येताच पाठीमागून त्याला अनुज थांब, अशी मित्राच्या आवाजामध्ये हाक ऐकू आली. त्यामुळे त्याने पाठीमागे वळून पाहिले असता यामाहा मोटारसायकवरून आलेल्या दोघा तरुणापैकी पाठीमागे बसलेल्या तरुणाने त्याचा हात पकडून गाडीवर बसविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने त्याच्या हाताला जोरात ओरखडा घेत आपली सुटका करुन घेतली. त्या दोघा तरुणांनी तोंडाला पांढऱ्या-पिवळ्या रंगाचा स्कार्फ बांधल्याचे त्याने सांगितले.
 

Web Title: Attempts to kidnap a schoolboy in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.