मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; तरुणास चोप
By Admin | Updated: November 28, 2014 00:31 IST2014-11-28T00:24:26+5:302014-11-28T00:31:24+5:30
गुरुवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.

मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; तरुणास चोप
कोल्हापूर : अंधाराचा फायदा घेत लक्ष्मीपुरी कोंडा ओळ चौकात खेळत असणाऱ्या दोन शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचा, तसेच अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्यपीस काल, बुधवारी नागरिकांनी चोप देत लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. संशयित मिलिंद रवींद्र पोतदार (वय २९, रा. फेजीवडे, ता. राधानगरी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला आज, गुरुवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, कोंडा ओळ चौकात सहा व सात वर्षांच्या दोन मुली इतर मुलांसोबत खेळत होत्या. यावेळी मिलिंद दारू पिऊन तेथे आला. त्याने सात वर्षांच्या बालिकेचा हात धरून ‘तू कुठे राहतेस, तुझं गाव कोणतं?’, अशी विचारणा केली. भांबावलेल्या बालिकेने पप्पा आलेत, असे सांगून सुटका करून घेत घर गाठले. तिने हा प्रकार आईला सांगितला. काही वेळाने पुन्हा मिलिंद तेथे आला. दुसऱ्या सहा वर्षांच्या बालिकेला उचलण्याचा प्रयत्न करीत असताना नागरिकांनी त्याला बेदम चोप देत लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सुरुवातीस बालिकेकडे विचारपूस केली. संशयित तरुण दारू पिल्याने माहिती देताना अडखळत बोलत होता.
पोलिसांनी त्याचा नेमका काय उद्देश होता, याची खातरजमा केली असता अश्लील चाळे करण्याच्या उद्देशाने त्याने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. संबंधित मुलीच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. (प्रतिनिधी)